मुंबई : सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, बुद्धिदाता अशा श्रीगणेशाचे मंगळवारी वाजतगाजत अगदी धुमधडाक्यात सार्वजनिक मंडळात आणि घरोघरी आगमन झालेल्या लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण व पावसाळी वातावरणात आज विसर्जन करण्यात आले. (Ganpati Visarjan 2023 Farewell to Ganpati Visarjan for one and a half days)
बाप्पांच्या आगमनाने महिला मंडळी, बच्चे कंपनींनी आपल्या लाडक्या बाप्पाला पहिल्याच दिवसापासून त्याच्या आवडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून गणेश भक्तांनीही प्रसादाचा आस्वाद घेतला. दोन वेळा आरती म्हणून त्या बाप्पाचे पूजन करण्यात आले. मात्र दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. सायंकाळी 9 वाजेपर्यंत चौपाटी, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव आदी विसर्जन स्थळी विधिवत पूजन, अर्चन करून आपल्या लाडक्या बाप्पांचे मनोभावे व पावसाळी वातावरणात विसर्जन करण्यात आले.
हेही वाचा – रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा… भक्तगणांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचे विमाकवच
मुंबई महापालिकेने मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील समुद्र, खाडी, तलाव आदी नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि कृत्रिम तलाव आदी विसर्जन स्थळी एकूण 260 विसर्जन स्थळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दीड दिवसांच्या एकूण 55,590 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये 96 सार्वजनिक गणेशमूर्तींचा आणि 38,319 घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.
या 38,415 विसर्जित गणेशमूर्तींमध्ये समुद्र, खाडी, तलाव आदी 69 नैसर्गिक विसर्जनस्थळी दीड दिवसांच्या विसर्जित 96 सार्वजनिक तर, 38,319 घरगुती अशा एकूण 38,415 गणेशमूर्तींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, 191 ठिकाणच्या कृत्रिम तलावांत विसर्जित दीड दिवसांच्या 49 सार्वजनिक आणि 17,126 घरगुती अशा एकूण 17,175 गणेशमूर्तींचा समावेश आहे.
हेही वाचा – ब्रह्मा धरीतो तालही रंगून… ‘ढोल कुणाचा वाजतो?’ पुणेरी ढोल-ताशा पथकात चढाओढ
मुंबई महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी आरोग्य पथक, जीवरक्षक, पोलीस, पालिका नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, 15 फिरते कृत्रिम तलाव, मोबाईल शौचालये, आरोग्य यंत्रणा, विद्युत व्यवस्था, निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश, निर्माल्य वाहतूक कारण्यासाठी वाहने, पार्किंग व्यवस्था केली आहे.