आरटीई प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून ‘गॅसबुक’ रद्द

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी निवासी पुराव्यातील गॅसबुक हा पर्याय रद्द करण्यात आला आहे.

rte

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी निवासी पुराव्यातील गॅसबुक हा पर्याय रद्द करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी करत आवश्यक कागदपत्रांची सुधारित यादी जाहीर केली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँक वगळता अन्य बँकांचे खातेपुस्तक (पासबुक) ग्राह्य धरले जाणार नसल्याचेही म्हटले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनायतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तर पालकांना १ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे पालकांना दिली आहे.

गेल्यावर्षी, २०२१-२२ पर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, गॅस बुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते पुस्तक, इतर स्थानिक बँकेचे खाते पुस्तक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणीकृत असलेला भाडेकरार यापैकी कोणतेही एक कागदपत्र गाह्य धरले जात होते. प्रवेश प्रक्रियेतील निवासी पुराव्यासाठीच्या कागदपत्रांत आता बदल करण्यात आला आहे.
रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन बिल देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यातील भाडेकरार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा. निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य न धरण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचेच खातेपुस्तक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. इतर पतसंस्था, स्थानिक बँकेचे खाते पुस्तक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.