घरमुंबईहक्काची घरे देण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे!

हक्काची घरे देण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे!

Subscribe

गेल्या पाच वर्षांत सरकारने गिरणी कामगारांसाठी एकही घर बांधलेले नाही. उलट बांधलेली घरे देण्यास चलढकलपणा केला आहे. त्यामुळे नाराज गिरणी कामगारांनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसह दिंडीद्वारे प्रति पंढरपूर गाठले आणि गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी सरकारच्या हृदयाला पाझर फुटु दे! देवा सरकारला सुबुद्धी दे,आमची हक्काची घरे आमच्या पदरात टाक!, असे साकडे विठ्ठलाला घातले. पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, असे अभंग बोलत कामगार महिला आणि पुरुष जवळपास तीन-साडेतीन तास पायी चालत वडाळा येथील मंदिरात दाखल झाले.

गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने ना.म. जोशी मार्गावरील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावरुन कामगारांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विविध ठिकाणचे गिरणी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुंबईतील गिरणी कामगारांनी ४०-५० वर्षांपूर्वी आध्यात्म्याच्या प्रेमापोटी गिरणगावात भजनकला जोपासली आणि गिरणगावच्या गल्ली बोळात, बैठकीच्या खोलीत प्रासादिक भजन मंडळांची स्थापना केली.अनेक भजनांच्या नामांकित भजनी बुवांसह बार्‍या गिरणगाव रंगू लागल्या. पुढे वडाळ्याच्या प्रतिपंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला दिंडीद्वारे जाण्याची प्रथा तेथूनच जन्माला आली. आज त्याच गिरणी कामगारांना हक्काच्या घरासाठी विठोबाला साकडे घालण्यासाठी वेगळी दिंडी काढावी लागली.

- Advertisement -

कामगार संघटना जवळपास १७-१८ वर्षे घराच्या प्रश्नावर लढत आहेत . आज १.७५ लाख कामगारांनी फॉर्म भरले आहेत. त्या पैकी आतापर्यंत फक्त ११ हजार कामगारांना घरे मिळाली आहेत. उर्वरित कामगारांना घरे कधी मिळणार?, अशी वेदना गिरणी कामगारांनी पांडुरंगाला साकडे घालताना बोलून दाखविली. या दिंडीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संघटनेच्या समन्वयक पत्रकार, नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर पांडे, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, गिरणी कामगार संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रवीण घाग, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे नंदू पारकर, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, शिवाजी काळे आदी कामगारनेते अग्रभागी होते. दिंडी लोअर परेल ब्रीज, लालबाग, साईबाबा मार्ग, जी.डी.आंबेकर मार्ग, परेल, भोईवाडा येथून वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आली.

कामगार संघटनांनी ओरड केली म्हणून म्हाडाने १५ ऑगस्टपूर्वी ६३००घरांची लॉटरी काढणार असे घोषित केले आहे. पण आगोदरच्या सोडतीत घरे लागलेल्या कामगारांनी पैसे भरुनही त्यांना घराचा ताबा दिलेला नाही. त्या साठी ६० वर्षांवरील वयस्कर कामगारांना म्हाडाची पायरी काठी टेकत झिजवावी लागत आहे. एम.एम.आर.डी.ए.च्या ८००० घरांची सोडत काढायची बाकी आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, पनवेल येथील १८४ एकर जमीन गिरणीकामगार घरांसाठीचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, आदी सर्व अनिर्णित प्रश्नांंची सोडवणूक झाली पाहिजे, अशी कामगारांनी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -