२०२२ मध्ये कोकणात जा सुसाट…

कोकणात जाणार्‍या नागरिकांना आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कोकणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत पनवेल ते झाराप या ४५० कि.मी अंतराच्या चौपदरीकरणाच्या कामापैकी २३०.७२ कि.मी. अंतराचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित महामार्गांचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १ हजार २६९ कि.मी धावणार हा महामार्ग मुंबई ते केरळमधील कोची या शहराला जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोकर व कालिकत हे प्रमुख शहरे या मार्गांवर आहे. कोकणातील जनतेसाठी हा राष्ट्रीय महामार्ग फार महत्वाचा आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गांचे काम अंत्यत संस्थ गतीने सुरू होते. त्यामुळे कोकणात जाणार्‍यांना अडचणी येत होत्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केव्हा पूर्ण होणार याबाबत नागरिकांकडून प्रश्न विचारले जात होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम १० पॅकेजमध्ये सुरू आहे. पहिल्या पॅकेजमध्ये पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास १२ वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला होता. सध्या पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच इतरही पॅकेजचे कामसुध्दा युध्दपातळीवर सुरू आहे.

गडकरी यांनी पत्राद्वारे दिली माहिती

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू नवीन वर्षांत कोकण दौर्‍यावर होते. तेव्हा त्यांनी कोकणातील विकास कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सध्याची परिस्थिती काय आहे, याविषयी नितीन गडकरी यांना कळवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे या महामार्गाची सध्याची स्थितीबद्दल माहिती दिली तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे, असेसुध्दा पत्राद्वारे कळविले आहे.