घरमुंबईसोनेरी बाजार  लखलखणार

सोनेरी बाजार  लखलखणार

Subscribe
साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. या सणासाठी मुंबईतील सर्व बाजारपेठा फुलल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत होणारे बदल या आठवड्यापासून स्थिरावल्याने गुरूवारी मुंबईसह देशभरात सोने खरेदीसाठी गर्दी होण्याचा विश्वास व्यापार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे. तर आगामी काळात लग्नाचे अनेक मुहूर्त असल्याने मोठ्या प्रमाणात दसर्‍याच्या दिवशी सोने खरेदी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट झाल्याने ग्राहक खूश असून, सोन्याप्रमाणेच दसर्‍याच्या मुहुर्तावर वाहन खरेदी देखील सुसाट होईल, अशी आशा आहे. विशेषत: दुचाकींची बुकिंग मोठ्या संख्येने करण्यात आल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.
मुंबईसह देशभरात गुरुवारी दसरा मोठ्या उत्साहात साजारा केला जाणार आहे. साडेतीन मुुहुर्तापैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस महत्वाचा मानला जातो. त्यासाठी गुरुवारी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीला पसंती दर्शविली जाणार आहे. या खरेदीसाठी मुंबईतील प्रमुख बाजारपेठा बुधवारपासूनच गर्दीने फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे. दसर्‍यापूर्वी सोन्याचे भाव दोनशे रुपयांनी वाढले होते. मात्र बुधवारी दर थोडा कमी झाला. सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३१ हजार ७४५ वर येऊन पोहचला होता. त्यामुळे सोने खरेदीला वाव मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्याही दरांवर होत आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने सोन्या-चांदीच्या दरातही अस्थिरता निर्माण झाली आहे.
शेअर बाजारातील अनिश्चिततेने गुंतवणुकदार धास्तावले असून ते सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी मुंबईत सोन्याचा दर प्रती दहा ग्रॅमला 20 रुपयांनी स्वस्त होऊन 31 हजार 745 रुपये झाला होता. चांदीच्या भावात प्रती किलोमागे 140 रुपयांची घट झाली आणि चांदीचा भाव 38 हजार 475 रुपये झाला. नोटाबंदी आणि जीएसटीमधून सराफा व्यावसायिक सावरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर स्थीर असल्याने यंदा विक्री वाढेल, असे मत व्यापार्‍यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ म्हणाले की, दसरा आणि त्यासारख्या मुुहुर्तावर सोने खरेदी करण्यास ग्राहक गेल्या काही वर्षांपासून सकारात्मक असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे यंदाही सोने आणि विशेषत डायमंड बाजाराला विशेष प्राधान्य असणार आहे. सोन्याचा बाजार येत्या काळात आणखीन वाढणार असल्याची शक्यता आहे. मात्र दसर्‍याला सोने खरेदी वाढेल, असे मत त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केले.

रिअल इस्टेटसाठी बहुपर्याय

गेल्या काही दिवसांपासून गृहनिर्माण क्षेत्र मंदीतून सावरलेला नाही. मात्र आता मुंबईकरांसमोर घरांचे बहुपर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्यातच व्याजदर सवलतीमुळे परवडणार्‍या घरांना ग्राहकांकडून मागणी आहे. मंदीतून गृहनिर्माण क्षेत्र सावरेल आणि ग्राहक बुकिंगसाठी वळेल, असा विश्वास विकासकांना वाटत आहे.

वाहन खरेदी ही सुसाट

वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे वाहन खरेदीवर परिणाम झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत असले तरी दसर्‍याच्या मुुहुर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होणार असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. यात विशेष करुन दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात असेल. तर अनेक वाहन कंपन्यांकडून विविध योजना आणि सवलत जाहीर केल्याने दसर्‍याच्या मुुहुर्तावर वाहन खरेदीही सुसाट होणार असल्याचे चित्र आहे. होंडाने दुचाकी खरेदीवर मोटार कार जिंकण्याची बंपर सोडत सुरू केली आहे. बजाज ऑटोकडून दुचांकीवर सर्व्हीस, अतिरिक्त विमा आणि वॉरंटी जाहीर केली आहे. हिरो आणि सुझुकीकडून दुचाकींवर सवलती देण्यात आल्या आहेत.

दादर मार्केट फुलले

दसर्‍याच्या पूर्वसंध्येला बुधवारी दादर मार्केट परिसरात मुंबईकरांची तोबा गर्दी पहायला मिळाली होती. यंदा दसर्‍याच्या निमित्तानेही बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव तसे फारसे चढलेले नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. इतर वेळी शंभरी ओलंडणार्‍या झेंडूच्या दर यंदा १०० रुपयांवरच कायम राहिल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात आपट्याची पानेदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ती खरेदीसाठी मुंबईकर पसंती दर्शवित असल्याचे चित्र पहायला मिळते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -