घरमुंबईखाकी वर्दीतला 'माणूस'! ६५ वर्षीय वृद्धाला दिले हक्काचे आश्रयस्थान!

खाकी वर्दीतला ‘माणूस’! ६५ वर्षीय वृद्धाला दिले हक्काचे आश्रयस्थान!

Subscribe

पोलीस म्हटले कि, डोळ्यापुढे येतो तो त्यांचा कठोरपणा… मात्र पोलिसांमधली भावनिकता क्वचित बघायला मिळते. मुंबईतील एका घटनेतून पोलिसांमधील भावनिकतेचे दर्शन नुकतेच पाहायला मिळाले. साकिनाका पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला हक्काचे घर मिळवून देण्यात मदत केली.

साकिनाका परिसरातील एका चाळीत लता परदेशी या ६५ वर्षीय वृद्ध महिला राहत होत्या. मुंबई महानगरपालिकेने त्यांचे घर बेकायदेशीर ठरवून पाडून टाकले होते. त्यामुळे त्या एक महिन्यापासून बेघर होत्या. अन्न व निवाऱ्याची सोय होत नसल्याने हताश होऊन त्या साकिनाका पोलीस स्थानकात गेल्या होत्या. पोलीस अधिकारी भालेराव यांनी त्यांची परिस्थिती जाणून घेतली. परदेशी या विधवा असून त्यांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर सुनेने त्यांना सांभाळण्याची जबाबदारी टाळली. त्यामुळे त्या साकिनाका परिसरात एकट्याच राहत होत्या. साकिनाका मधील एका रुग्णालयात त्यांनी २० वर्षे काम केले होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे काम सुटले होते आणि महानगरपालिकेमुळे घरही गेले होते. त्यामुळे परदेशी हताश झाल्या होत्या.

- Advertisement -

साकिनाका पोलीसांनी त्यांची परिस्थीती जाणून घेऊन त्यांना मदत करण्याचे ठरवले. पोलीस स्थानकातील सर्व पोलिसांनी मिळून त्यांच्यासाठी २३ हजार रुपये गोळा केले. कर्जत येथील वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी हक्काच्या निवाऱ्याची सोय केली. पोलिसांकडून दोन दिवस मिळालेल्या प्रेमळ वागणुकीने परदेशी भारावून गेल्या. सर्व पोलिसांचे आभार मानत आपल्याला आपुलकीची वागणूक मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पोलीस अधिकारी श्री. भालेराव हे आपल्या मुलाप्रमाणे असून त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमात भेटण्यास अधून मधून येत जा, अशी इच्छाही परदेशी यांनी व्यक्त केली. भालेराव यांनीही त्यांच्या इच्छेचा स्वीकार करत आपण महिन्यातून एकदा नक्कीच भेटायला येऊ, असे आश्वासनही दिले.

- Advertisement -

भालेराव यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. ते मूळचे नाशिकचे असून त्यांनी एमबीए केल्यानंतर एमपीएससी परीक्षा पास केली होती. साकिनाका पोलिसांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -