मुंबईकरांना खुशखबर; तलाव क्षेत्रातील रिमझिम पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ

 तलावात ५१ दिवसांचा पाणीसाठा,  मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लि. पाणीपुरवठा

Good news for Mumbaikars Increased water storage due light rain falling in lake area

मुंबईत गुरुवारपासून पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईत मान्सून दाखल झाल्याचे म्हटले आहे. या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातही रिमझिम बरसात केली आहे. गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रांत एकूण २७९ मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणी साठ्यात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक गोड बातमी आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडून तलावातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी तलावात सर्वाधिक ९३ मिमी, विहार तलावात ८५ मिमी, तानसा तलावात ५४ मिमी, भातसा तलावात २१ मिमी, मोडक सागर तलावात २० मिमी, मात्र मध्य वैतरणा तलावात ४ मिमी व उच्च वैतरणा तलावात २ मिमी इतका कमी पाऊस पडला आहे.

वर्षभरासाठी आवश्यक पाणीसाठा

मुंबईला वरील सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी तलावात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. या सात तलावांपैकी विहार व तुळशी हे दोन तलाव मुंबईत पूर्व उपनगर भागात असून उर्वरित पाच मोठे तलाव हे मुंबई बाहेर ठाणे जिल्हा परिसरात आहेत.

या सात तलावांपैकी सर्वात जास्त म्हणजे एकूण पाणीसाठ्याच्या जवळजवळ ५० टक्के म्हणजे ७,१७,०३७ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा एकट्या भातसा तलावातून केला जातो. तर सर्वात कमी पाणीपुरवठा क्षमतेने कमी असलेल्या तुळशी ( ८,०४६ दशलक्ष लि.) व विहार ( २७,६९८ दशलक्ष लि.) या तलावातून होतो. उर्वरित पाणीपुरवठा हा तानसा १,४५,०८०दशलक्ष लि.), मध्य वैतरणा (१,९३,५३० दशलक्ष लि.), मोडक सागर (१,२८,९२५ दशलक्ष लि.), उच्च वैतरणा (२,२७,०४७ दशलक्ष लि.) या चार तलावांतून होतो.

तलावात ५१ दिवसांचा पाणीसाठा

सात तलावांत सध्या १,९८,५६८ दशलक्ष लिटर (१३.७२टक्के) इतका पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांतील ९ व १० जूनच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. मात्र पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा अधिक आहे. ११ जून २०२१ मध्ये सात तलावात मिळून एकूण १,८२,९०२ दशलक्ष लि. (१२.६४ टक्के) इतका, ११ जून २०२० मध्ये सात तलावांत एकूण १,९२,४०७ दशलक्ष लि. (१३.२० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र तलावात १,९८,५६८ दशलक्ष लिटर इतका (१३.७२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा व शिल्लक पाणीसाठा यांचे गणित केल्यास सदर पाणीसाठा हा मुंबईकरांना पुढील ५१ दिवस पुरेल इतका म्हणजेच पुढील ३१ जुलै २०२२ पर्यंत पुरेल इतका आहे.

पाऊस लांबल्यास पाणीकपातीचे संकट

हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र कधी कधी हवामान खात्याचे अंदाज चुकतात. त्यामुळे जर यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यास अथवा कमी पाऊस पडल्यास तलावातील एकूण पाणीसाठयाचे गणित करून वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला नाईलाजाने कमी – अधिक प्रमाणात पाणीकपात करावी लागते..

सात तलावातील पाणीसाठा -:

तलाव २ दिवसातील पाणीसाठा

पाऊस मिमी दशलक्ष लि.

उच्च वैतरणा २.०० ०

मोडकसागर २०.०० ४७,७४६

तानसा ५४.०० ९,७०९

मध्य वैतरणा ४.०० ३८,१५१

भातसा २१.०० ९६,८४४

विहार ८५.०० ३,८३२

तुळशी ९३.०० २,२८६


भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल