घरमुंबईGood News! कोरोनाबाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीने ३०० चा टप्पा केला पार!

Good News! कोरोनाबाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीने ३०० चा टप्पा केला पार!

Subscribe

३०० व्या कोविड बाधित मातेची सुखरुप प्रसूती; बाळ - बाळंतीण सुखरुप

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ‘कोरोना कोविड १९’ बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा काल रात्री ओलांडून कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज सकाळ पर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर गेल्या २ महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोविड बाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे.
तान्हुल्यांच्या टॅ्याह्यांच्या मंगलस्वरांनीही त्रिशतकी टप्पा ओलांडला असून बाळांचीही संख्या आज सकाळपर्यंत ३०६ झाली आहे, अशी माहिती नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात ३०० कोविड बाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.

नवजीवन फुलवण्यात मोलाची भूमिका

मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी ‘पीपीई किट’ घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे.

या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ‘पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे गेल्या दोन महिन्यांपासून घरी न जाता रुग्णालयात राहूनच अथकपणे काम करीत आहेत.

- Advertisement -

गेले दोन महिने सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सीमा चव्हाण, रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक

यानिमित्ताने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी तिन्ही विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. तर कोविड विषयक समन्वयक डॉक्टर सारिका पाटील आणि डॉक्टर सुरभी राठी यांनीही तिन्ही विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक केले आहे.


दोन महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू; माहिती लपवण्याचा प्रयत्न
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -