घरमुंबईचित्रनगरीतील ‘गार्ड’ना वाचवण्यासाठी रचला बनाव

चित्रनगरीतील ‘गार्ड’ना वाचवण्यासाठी रचला बनाव

Subscribe
गुन्हा एकीकडे, मात्र नोंद दुसरीकडे

गोरेगाव येथील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’तील व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाच्या इमारतीत गेल्या 16 मे रोजी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर काही जणांनी हल्ला केला. ही घटना घडली ते ठिकाण आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असतानाही, आरेतील अधिकाऱ्यांनी आणि आरे पोलिसांनी ही घटना फरिश्ते मैदानात घडल्याचा बनाव करत याबाबतचा गुन्हा आरे पोलिसांत न करता दिंडोशी पोलिसांत दाखल केल्याचा आरोप या हल्ल्यातील पीडिताने केला आहे. तर हा प्रकार चित्रनगरीतील ‘महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बला’च्या गार्ड्सना वाचवण्यासाठी केल्याचा आरोप याप्रकरणातील पीडिताने याबाबत बोलताना केला आहे.

ज्याच्यावर हल्ला झाला त्या पदाधिकाऱ्याचे नाव अन्वर सय्यद असे असून, या घटनेतील आरोपींना ‘महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बला’च्या गार्डसनी चित्रनगरीत कोणालाही सहजासहजी प्रवेश मिळत नसतानाही हल्लेखोरांना सोडल्याचा आरोप होत आहे. आत येऊन अन्वर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी शिवा शेट्टी, रणजीत, राजू, निषाद, सुनिल शिर्के, गणेश, संजय यांच्यासह इतर पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी चित्रनगरीत येताना त्यांना गेटवरून सुरक्षा रक्षकांनी कोणतीही शहानिशा अथवा त्यांची चौकशी न करता सोडले होते. त्यानंतर हल्ला करून नंतर ते मागील गेटवरून पसारही झाले. त्यावेळीही गार्डनी त्यांना अडवले नाही. हा हल्ला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर होताना घाबरुन अन्वर सय्यद हे थेट या कार्यालयात शिरले. मात्र तेथेही त्यांच्यावर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. हा प्रकार तेथील अनेकजणांनी पाहिला आहे. तरीही आरे पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल न करता हा हल्ला चित्रनगरीच्या गेटबाहेर आणि दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे भासवत तेथेच गुन्हा दाखल केला. यात चित्रनगरीच्या गार्डसना वाचवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, संपूर्ण चित्रनगरीचा परिसर हा आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर बाहेरचा परिसर हा दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे चित्रनगरीत हा प्रकार दाखवला तर त्याला गार्डस जबाबदार ठरतील म्हणून याप्रकरणी आरे पोलिसांत गुन्हा दाखल न करता दिंडोशी पोलिसांत केला असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, याबाबत चित्रनगरीचे मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रकांत कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपला मोबाईल उचलला नाही, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -