मुंबईत गोवरचा प्रसार कमी, पण धोका कायम; टास्क फोर्सचा इशारा

मुंबईः गेल्या वर्षी नोव्हेंबर , डिसेंबर महिन्यात हैराण करून सोडणाऱ्या गोवरचा प्रसार आता कमी झाला आहे. तरी गोवरचा धोका कायम असणार आहे, असा इशारा टास्क फोर्सचे अध्यक्ष व माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गोवरच्या प्रादुर्भावापासून लहान मुलांना वाचण्यासाठी लसीकरणावर जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला केली आहे. मार्च २०२० पासून २०२२ पर्यंत मुंबईकरांना कोरोनाच्या उद्रेकाने हैराण करुन सोडले होते. केंद्रीय, राज्य स्तरीय व मुंबई महापालिका स्तरीय आरोग्य यंत्रणेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईसह राज्याला व देशालाही २०२२ च्या अखेरीस कोरोनावर नियंत्रण आले व मोठा दिलासा मिळाला.

मात्र त्याचवेळी मागील वर्ष सरताना व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना गोवरने डोके वर काढले होते. विशेषतः मुंबईतील गोवंडी विभाग हा गोवरचा ‘हॉटस्पॉट’ झाला होता. सध्या, मुंबईत गोवर बाधित रुग्ण संख्या १४५ असून आतापर्यंत २३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र गोवरचा उद्रेक पाहता राज्य सरकारने व पालिकेनेही चांगलीच कंबर कसली व अधिकच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरु केल्या. परिणामी मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवरचा प्रादुर्भाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

पालिकेने योग्य वेळी आणि योग्य अशा उपाय योजना केल्याने गोवर रुग्ण संख्या अगदी शून्यावर आली आहे. गोवर बाधित रुग्ण संख्येत जरी घट होत असली तरी लहान मुलांचे लसीकरणावर पूर्ण होत नाही तोपर्यंत गोवरचा धोका कायम असणार आहे. मुंबईत राज्यातील नागपूर, पुणे आदी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे, असे डॉ. सुभाष साळुंके यांनी स्पष्ट केले.

मुंबईत असे झाले लसीकरण
८४ आरोग्य केंद्रात ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील एकूण २,३२,१५९ बालकांपैकी २,०९,८७१ (९०.४० टक्के ) बालकांना आतापर्यंत गोवर रूबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली.