सरकारी कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या

मुंबईमध्ये दोन दिवसामध्ये सहकुटुंबासह आत्महत्या करण्याची दुसरी घटना घडली आहे. मुंबईच्या वांद्रे भागात एका सरकारी कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. या चौघांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

bandra suicide case
वांद्र्यातील भिंगारे कुटुंबियांची आत्महत्या

मुंबईतील वांद्र्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश भिंगारे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन या चौघांनी जीवन संपवले आहे. राजेश भिंगारे विधानपरिषदेत कामाला होते

झुरळाचे औषध पिऊन चौघांची आत्महत्या

वांद्र्याच्या खेरवाडी परिसरातील शासकिय वसाहतीतील इमारत क्रमांक २ मध्ये ही घटना घडली आहे. या इमारतीमध्ये ४७ वर्षाचे राजेश भिंगार राहत होते. त्यांनी पत्नी अश्विनी, दोन मुलं गोरांग आणि तुषार यांच्यासह विष प्राशन करुन आत्महत्या केली. झुरळ मारण्याचे औषध पिऊन या चौघांनी आत्महत्या केली. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

“मागच्या १५ दिवसापासून राजेश कामावर गेले नाही. त्यांचा फोनही लागत नव्हता. राजेश अतिश कंष्टाळू आणि मनमिळावू होते. मागच्या वर्षी त्यांच्या मुलाला १० वीला ९० टक्के मिळाले होते. राजेश भिंगारे यांचा मागच्या महिन्यात कार्यालयात वाढदिवस साजरा केला होता. कधीच असे वाटले नव्हते की ते असं काही करतील.” –  राजेश भिंगारे यांच्या कार्यालयातील सहकारी

आर्थिक चणचणीला कंटाळून केली आत्महत्या

राजेश सरकारी नोकर असून रायगड जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागात ते कार्यरत होते. सध्या त्यांची तात्पुरती नेमणुक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात केली होती. राजेश भिंगारे यांच्या घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात गरिबीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिले आहे. सरकारी नोकरीला असून सुद्धा मुंबईमध्ये हक्काचे स्वतःचे घर नाही. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सहकुटुंबासह आत्महत्येची दुसरी घटना

गेल्या दोन दिवसात मुंबईमध्ये सहकुटुंबसह आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी मुंबईच्या कफ परेड भागामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली होती. प्रवीण पटेल(४०), वीणा पटेल(३५), मुलगा प्रभू पटेल (११) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने आणि इतरांकडून होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रविण यांनी लिहिलेल्या डायरीतून समोर आले आहे. आम्हाला त्रास देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आलेली आहे. पोलीसंकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.