घरमुंबईआपलं महानगर इम्पॅक्ट; कुकर्माची अखेर...

आपलं महानगर इम्पॅक्ट; कुकर्माची अखेर…

Subscribe

‘कुर्वेंची कुकर्मे’ या मथळ्याखाली आपलं महानगरने दिलेल्या बातमीची दखल थेट मुख्य सचिव डी. के. जैन यांनी घेतली आहे. जैन यांनी राज्यात सनदी अधिकार्‍यांच्या घरात असलेल्या सरकारी नोकरांची माहिती देण्याबरोबरच त्यांना तात्काळ आपल्या मूळ कामावर रुजू करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी सोमवारी दिल्याचे सांगण्यात आले

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या घरी सरकारी कर्मचार्‍यांना घरगडी म्हणून राबवण्याच्या ‘आपलं महानगर’च्या वृत्ताची यांनी गंभीर दखल घेतली. कुर्वे राहत असलेल्या महालक्ष्मी येथिल श्यामनिवास निवासस्थानी राबणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांनाराज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन  तात्काळ कार्यालयात रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूरमध्ये जिल्हाधिकारी असताना कुर्वे यांच्या निवासस्थानी कोण काम करत होते, याचीही माहिती मुख्य सचिवांनी मागितली आहे. राज्यात सनदी अधिकार्‍यांच्या घरात असलेल्या सरकारी नोकरांची माहिती देण्याबरोबरच त्यांना तात्काळ आपल्या मूळ कामावर रुजू करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी सोमवारी दिल्याचे सांगण्यात आले.

‘आपलं महानगर’ने सोमवारी ‘कुर्वेंची कुकर्मे’ या शीर्षकाखाली सरकारी कर्मचार्‍यांकडून घरगड्याची कामे करवून घेतली जात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर लगोलग सचिन कुर्वे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र बोरकर यांना आदेश देत तात्काळ कर्मचार्‍यांना मूळ ठिकाणी पाठवण्यास सांगितले. सदर प्रतिनिधीने बोरकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबाबत कानावर हात ठेवत तुमच्याकडे तक्रार आली आहे का, माझ्याकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही, असे सांगितले. मात्र, सोमवारपासूनच तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी आपापल्या कार्यालयात कामावर रुजू झाल्याचे एका तहसिलदाराने सांगितले.

- Advertisement -

सचिन कुर्वे यांचा रुबाब केवळ मुंबईतच आहे, असे नाही. नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही कुर्वे यांनी सरकारी कर्मचार्‍यांना आपल्या निवासस्थानी राबवले असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरच्या सरकारी बंगल्यावर एकाचवेळी 15 कर्मचारी राबत होते. मुंबईत गेल्यावरही त्यांनी हाच प्रकार कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. नागपूरमध्ये असताना कर्मचार्‍यांबरोबरच विविध विभागांची वाहनेही कुर्वे यांच्या दिमतीला होती, अशी माहिती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ज्येष्ठ अधिकार्‍याने दिली. घरी राबणार्‍या कर्मचार्‍यांना कुर्वे यांच्या कुटुंबियांकडून बाजारहाटही करायला लावले जायचे आणि इतर सगळी कामे करून घेतली जायची. आपलं महानगरने सोमवारी हे प्रकरण बाहेर काढल्यावर त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. मंत्रालयात तर या वृत्ताने खळबळ उडाली. डी. के. जैन यांनी याची दखल घेत कुर्वे यांच्या निवासस्थानी राबणार्‍या कर्मचार्‍यांची तात्काळ सुटका केली आणि त्यांना पुन्हा आपल्या मूळपदावर रवाना होण्याचे आदेश दिले. याशिवाय राज्यात ज्या सनदी अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना आपल्या बंगल्यावर काम करण्यासाठी ठेवले आहे, अशा अधिकार्‍यांची माहिती तात्काळ मागवली असून, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी हे काम आजच सुरू केल्याची माहिती मिळते.

माहिती घेतली जात आहे
राज्य सरकारी अधिकार्‍यांच्या घरी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना कामावर ठेवले जाते, अशा तक्रारी आजवर आल्या नव्हत्या. पण माध्यमांमधून याची माहिती मिळाल्याने सर्व अधिकार्‍यांकडून माहिती घेतली जात आहे. – नंदकुमार, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग

- Advertisement -

 

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -