मुंबई : 14 व्या विधानसभेची मुदत संपून 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याने सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी मंत्रालयातील मंत्र्यांची दालने ताब्यात घेतली. मंत्र्यांच्या आणि त्यांच्या आस्थापनेवर काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांच्या दालनातील साहित्य बाहेर काढण्यात आले असून मंत्र्यांची दालने सील करण्यात आली आहेत. नव्या सरकारचा शपथविधी होऊन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर नव्या मंत्र्यांना पुन्हा दालने वितरित करण्यात येतील. दरम्यान, मंत्र्यांची दालने सील झाली असली तरीही दालनाबाहेरच्या त्यांच्या नावाच्या पाट्या अद्याप कायम आहेत. (government orders closure of ministry work after eknath shinde resigns)
सामान्य प्रशासन विभागाने 28 नोव्हेंबरला पत्र पाठवून मुख्यमंत्री आणि मंत्री यांची दालने, कार्यालयातील कागदपत्रे, नोंदवह्या, फर्निचर यांची आवराआवर करून दालने तसेच कार्यालयाचा ताबा सुपूर्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 29 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वच मंत्र्यांची दालने रिकामी करण्याची लगबग सुरू होती.
सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चाने त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या दालनात लाकडी खुर्ची आणली होती, असे सांगण्यात येते, पण आता पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची लाकडी खुर्ची कोणालाही विशेषतः माध्यमांना कुणकुण न लागता मंत्रालयातून गुपचूप बाहेर काढण्यात आली. त्यामुळे मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे दालन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीविना असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – BMC : बेस्ट परिवहन 2,132 कोटी रुपयांनी तोट्यात तर विद्युत विभाग 46.18 कोटींनी नफ्यात
मंत्रालयातील सर्व मंत्र्यांची दालने सील करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या दालनातील भलेमोठे टीव्ही, सोफासेट, खुर्च्या काढण्यात आल्या असून संगणकही काढले आहेत. माजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनातील सोफा वाहनात भरण्यात आला, पण हा सोफा एमआयडीसीचा असल्याचे समजल्यानंतर तो पुन्हा त्यांच्या दालनात नेऊन ठेवण्यात आला. मंत्रालयातील कोणत्याही मजल्यावर फेरफटका मारला तर मंत्र्यांच्या दालनातील सामान-कागदपत्रे लोखंडी ट्रॉलीवर टाकून बाहेर नेतानाचे दृश्य बघायला मिळत होते. कागदपत्रे फाडून टाकल्यामुळे बहुतांश मंत्र्यांच्या दालनात कागदपत्रांचा ढीग जमा झाला आहे.
मंत्र्यांनी दालने रिकामी केली असली तरी एकाही मंत्र्याच्या दालनाबाहेरील नावाची पाटी अद्याप काढलेली नाही. आपल्याला पुन्हा मंत्रीपद आणि तेच खाते मिळेल या आशेवर अनेक माजी मंत्री आणि त्यांचा स्टाफ आहे. एखाद्या मंत्र्याला तेच खाते मिळाले तर उगाचच मंत्र्यांचा रोष नको म्हणून सरकारी कर्मचारीही त्यांच्या नावाच्या पाटीला हात लावण्यास धजावले नाहीत. आता या पाट्या त्याच राहतील की नवीन नावाच्या पाट्या बघायला मिळतील याचे चित्र पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे. (government orders closure of ministry work after eknath shinde resigns)
हेही वाचा – New Government : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? यावेळी ठिकाण बदलण्याची शक्यता
Edited by : Ashwini A. Bhatavdekar