Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आता करोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई!

आता करोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई!

Subscribe

‘करोना व्हायरसबददल जो व्यक्‍ती सोशल मीडियावर खोडसाळपणाचे, अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल करत असेल, त्‍याला शोधून काढून कारवाई करण्यात येणार आहे. राज्‍यात किंवा देशात अद्यापपर्यंत एकही करोनाचा रूग्‍ण आढळलेला नाही. विमानतळे किंवा बंदरे आदी सर्व ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. महाराष्‍ट्रातील जितक्‍या व्यक्‍ती चीन किंवा अन्य बाधित देशांमध्ये अडकल्‍या असतील, त्‍या सर्वांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने प्रयत्‍न करण्यात येत आहेत’, अशी माहिती आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

बंदरांवर देखील स्क्रीनिंगची व्यवस्था

करोना विषाणूच्या बाबत संजय पोतनीस आदींनी लक्षवेधी सूचना उपस्‍थित केली होती. ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्‍या अफवांवर कारवाई करावी’, अशी मागणी पोतनीस यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळांप्रमाणेच राज्‍यातील जेएनपीटीसारख्या महत्‍वाच्या बंदरांवर देखील तपासणीची व्यवस्‍था आहे का? असा प्रश्न केला. त्‍यावर विमानतळांवर १२ बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्‍क्रीनिंग केले जाते. त्‍याचनुसार बंदरांवरही स्क्रीनिंगची व्यवस्‍था करण्यात आल्‍याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

करोनाबाबत काय खावे काय खाऊ नये, यासोबतच सर्व प्रकारच्या खबरदारी बाळगण्याच्या सूचना सरकारमार्फत देण्यात येत आहेत. जो कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्‍न करेल, त्‍याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्‍याचे राजेश टोपे म्‍हणाले. कोंबडयांच्याबाबत जे अफवांचे मेसेज व्हायरल करण्यात आले, त्‍यामुळे पोल्‍ट्री उदयोगाला मोठा फटका बसला आहे. पशुपालन आयुक्‍तांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे. हा मेसेज मूळ कोणी तयार केला, त्‍या व्यक्‍तीपर्यंत पोलीस पोहोचतील असे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

‘त्यांच्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू’

रोहित पवार, सुनिल प्रभू यांनी ‘महाराष्‍ट्रातील अनेक व्यक्‍ती चीन किंवा अन्य बाधित देशांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्‍यांना परत आणण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली?’ असा प्रश्न केला. त्‍यावर ‘केंद्र सरकार या प्रकरणावर अतिशय जागरूक आहे. केंद्राच्या मदतीने राज्‍यातील रहिवाशांना परत देशात आणण्याचे प्रयत्‍न सुरू’, असल्‍याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -