आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न

माहुलवासीयांचे पोलिस ठाण्यात धरणे

Mahul resident celebrate black Diwali
फाइल फोटो

सुरक्षित वातावरणातील घरासाठी रविवारपासून माहुलवासीयांनी शांततेत विद्याविहार येते पुकारलेला संप दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणार्‍या स्थानिकांना टिळकनगर पोलिसांकडून दमदाटी करण्यात येत आहे. तसेच सोमवारी सात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना हीन वागणूक देण्यात आली.

शहरातील रस्ते काम आणि तानसा जलवाहिनीमध्ये विस्थापित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांना चेंबूरमधील माहुल येथे स्थलांतरीत केले आहे. येथील रासायनिक व तेल शुद्धीकरण कंपन्यांमुळे येथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने येथील प्रकल्पग्रस्तांना इतर ठिकाणी राहण्यास घर द्यावे किंवा घरासाठी भाडे द्यावे असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. मात्र याची अंमलबजावणी करण्यास सरकारकडून नकार देण्यात आल्यामुळे रविवारपासून माहुलवासीयांनी विद्याविहार येथे त्यांच्या जुन्या घरांच्या जागेचा ताबा घेण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. रविवारी सकाळपासून आंदोलन करत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना आंदोलनाच्या ठिकाणी रविवारी रात्री दिव्याची व जेवणाची सोय तेथील ‘घर बनाओ, घर बचाओ’ व ‘जीवन बचाओ आंदोलना’च्या समर्थकांकडून करण्यात येत होती.

मात्र आंदोलकांना विजेचे कनेक्शन व जेवण देऊ नये अशी तंबी टिळकनगर पोलिसांकडून देऊन त्यांना दमदाटी करण्यात आली. तसेच सोमवारी सकाळी टिळकनगर पोलिसांनी सात आंदोलनकर्त्यांना विनाकारण ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने संतप्त झालेल्या अन्य आंदोलकांनी आपला मोर्चा थेट टिळकनगर पोलिस ठाण्याकडे वळवला व पोलिस ठाण्याबाहेरच आंदोलन सुरू केले. यावेळी सरकार व पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षित वातावरणात घर मिळणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन कायम राहिल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

आंदोलकांनी दिवसभर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केल्यानंतर अखेर सायंकाळी आंदोलकांना सोडण्यात आले. तसेच यापुढे आंदोलकांना कोणत्याही प्रकारे त्रास देण्यात येणार नाही अशी हमी टिळकनगर पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती घर बचाओ आंदोलनाचे सदस्य बिलाल खान यांनी दिली.

‘आप’ही उतरणार आंदोलनात

सकाळी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची पोलिसांकडून दिवसभर उपासमार करण्यात आली. ही बाब निंदनीय आहे. पोलिसांच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. आप पक्षातर्फे आम्ही आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या आंदोलनात यापुढे आम्ही सहभागी होणार आहोत, अशी माहिती आपचे नेते धनंजय शिंदे यांनी दिली.

आम्ही शांततेत आंदोलन करत असतानाही पोलिसांकडून आम्हाला त्रास देण्यात येत आहे. आंदोलकांना ताब्यात घेणे व आम्हाला मदत करणार्‍या समर्थकांना दमदाटी करणे म्हणजे सरकारकडून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
– बिलाल खान, सदस्य, घर बचाओ आंदोलन