‘बीएमसी अर्ध मॅरेथॉन प्रोमोरन’ला उत्तम प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं फिट तो इंडिया फिट’ या घोषणेसह ‘फिट इंडिया’ या अभियानाची सुरुवात केली. याच अभियानातून प्रेरणा घेऊन आपल्या मुंबईला सुदृढतेची अर्थात फिटनेसची राजधानी करणे, या उद्देशाने मुंबई महापालिकेद्वारा आयोजित ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन प्रोमो रन'ला रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं फिट तो इंडिया फिट’ या घोषणेसह ‘फिट इंडिया’ या अभियानाची सुरुवात केली. याच अभियानातून प्रेरणा घेऊन आपल्या मुंबईला सुदृढतेची अर्थात फिटनेसची राजधानी करणे, या उद्देशाने मुंबई महापालिकेद्वारा आयोजित ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन प्रोमो रन’ला रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी कोणत्याही बक्षिसाची घोषणा केलेली नसतानाही, बारा वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८४ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक, महापालिका, भारतीय स्टेट बँक, भारतीय नौदल आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी असा जवळजवळ ४ हजार २०० नागरिकांचा ‘हाफ मॅरेथॉन प्रोमो रन’मध्ये सहभाग लाभला.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, भारतीय स्टेट बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी. शंकर व मुंबई मेट्रो परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. राणा यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन प्रोमो-रनचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक (नेटवर्क १) मनोज सिन्हा, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) पवन केडीया, उप महाव्यवस्थापक (मुंबई मुख्य शाखा) विमलेंदु विकास, अर्ध मॅरेथॉन प्रोमो-रनचे समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आणि मुंबई महापालिका, भारतीय स्टेट बँक यांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

‘प्रोमो – रन’ हा ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा तीन अंतरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मुंबई पोलीस दलाचे व मुंबई वाहतूक पोलिसांचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. या ‘अर्ध मॅरेथॉन’ मध्ये ४ हजार २०० व्यक्तींनी सहभाग नोंदविला.

शस्त्रक्रियेनंतरही रतनचंद ओसवाल यांचा सहभाग

‘फिटनेस दिलसे’, असे घोषवाक्य असणाऱ्या प्रोमो-रन मध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सर्व धावपटूंमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असणारे ८४ वर्षीय रतनचंद ओसवाल यांनी तरुणांना लाजवत १० किलोमीटरचे अंतर धावत धावत लिलया पार केले. विशेष म्हणजे त्यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया (बायपास सर्जरी) झाली असून हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन त्यानुसार मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या ‘झिपर्स क्लब’चे ते सदस्य आहेत.

दरम्यान, आजच्या प्रोमो-रन‌ दरम्यान धावण्याच्या मार्गावर विविध ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, साफसफाई इत्यादी व्यवस्था सक्षमपणे करण्यात आली होती. यासाठी मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी काल संध्याकाळपासूनच अव्याहतपणे कार्यरत होते.


हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, त्याआधीच हे सरकार पडणार – आदित्य ठाकरे