Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बेस्टच्या 'त्या'ट्रामचा वनवास संपणार, पुढील आठवड्यात ग्रीन सिग्नल

बेस्टच्या ‘त्या’ट्रामचा वनवास संपणार, पुढील आठवड्यात ग्रीन सिग्नल

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Related Story

- Advertisement -

एकेकाळी मुंबईची शान म्हणून ओळखली जाणारी ट्राम बेस्टने कात टाकल्याने कालबाह्य झाली. पुढे ट्रामचा एक सांगाडा कोलकत्ता येथून मुंबईत आणण्यात आला व तो वडाळा येथील आणिक आगारात ठेवण्यात आला. बेस्टने या ट्रामच्या सांगाड्याची डागडुजी करून ती ट्राम मुंबईकरांसमोर आणण्यासाठी सीएसएमटी येथील भाटिया गार्डनमध्ये ठेवली ; पुढे तिच्या लोकार्पणात कोरोना आडवा आला आणि ‘ती’ आजही भाटिया गार्डनमध्ये झाकोळलेल्या अवस्थेत पडून आहे. मात्र आता तिचा वनवास संपुष्टात येणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या ट्रामचे लोकार्पण होणार आहे. यासंदर्भातील माहिती नगरसेविका सुजाता सानप यांनी दिली आहे.

ब्रिटिश काळात मुंबईतील रस्त्यांवर बैलगाडी,घोड्याला जोडलेली ट्राम,ब्रिटिशांची विंटेज कार धावत असे. मात्र त्यानंतर विजेवर धावणारी ट्राम मुंबईत दाखल झाली. या ट्रामने मुंबईकरांना त्यावेळी चांगलीच भुरळ घातली होती.वाहतुकीचे साधन म्हणून ‘ट्रॉम’ला मुंबईकरांची जास्त पसंती होती. मात्र नंतर बेस्टने कात टाकली आणि बेस्ट वाहतुकीचे रुपडे पालटले.
त्यावेळी लोकांच्या मनात घर करून बसलेल्या ‘ट्रॉम’ला वडाळा येथील आणिक आगारात अनेक वर्षे ठेवण्यात आले. नंतर या ट्रामला मुंबईकरांना बघता यावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पालिकेच्या भाटिया गार्डनमध्ये दर्शनीय ठिकाणी ठेवण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी त्या ट्रामच्या डागडुजीवर १६ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. आता या ट्रामला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शेजारील पालिकेच्या भाटिया गार्डनमध्ये दर्शनीय ठिकाणी स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

मात्र मार्च २०२० पासून कोरोनाचे वातावरण सुरू झाले आणि ट्रामचा वनवास संपता संपता रखडला. या नवीन वर्षात २८ जानेवारी रोजी ट्रामचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यावेळीही वेळेचे गणित जुळले नाही आणि तो कार्यक्रम पुढे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे ठरले आहे. आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या भाटिया गार्डनमधील लोखंडी रुळावर रखडलेल्या आणि झाकोळलेल्या ट्रामला ‘ग्रीन सिग्नल’ देतील आणि मग ट्रामचा वनवास संपुष्टात येईल. मुंबईकरांना, देश – विदेशातील पर्यटकांना या ब्रिटिश कालीन ट्रामच्या रुपात आणखीन एका पर्यटनाचे दालन उघडे होणार आहे.

 जाणून घ्या ट्रामबाबत

मुंबईत १८७३ मध्ये ‘द बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेड’ ची स्थापना करण्यात आली. ९ मे १८७४ मध्ये यक कंपनीने एक घोड्याची व दोन घोड्यांची ट्राम रस्त्यावर आणली. एका घोड्याच्या ट्राममध्ये २५ प्रवासी क्षमता होती तर दोन घोड्यांच्या ट्राममध्ये ४० प्रवासी क्षमता होती. त्यावेळी घोडा ट्रामचे तिकीट १ आणा म्हणजेच ६ पैसे होते. त्यावेळी २० गाड्या आणि २०० घोडे या घोडा ट्रामच्या ताफ्यात असत. कुलाबा ते पायधुनी आणि बोरबंदर ते पायधुनी अशा ट्रामच्या प्रवास फेऱ्या होत असत. त्यावेळी पहिल्याच आठवड्यात ट्रामच्या २९४ फेऱ्यांमधून ३ हजार १३५ प्रवाशांनी प्रवास केला.

- Advertisement -

१९०५ च्या सुमारास मुंबई महापालिकेने ‘द बॉम्बे इलेक्ट्रिक ऍण्ड ट्रामवेज’ स्थापन केली. त्यावेळी विजेची ट्राम मुंबईत आली. ७ मे १९०७ ला विजेवरील ट्रामचे उदघाटन झाले. त्यावेळी ट्रामचे तिकीट दर १० पैसे होते. या ट्रामला मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या एकमजली ट्रामला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढे सप्टेंबर १९२० च्या सुमारास मुंबईत डबल डेकर ट्राम सुरू झाली. मात्र पुढे काही कारणास्तव ज्या मार्गावरील ट्राम तोट्यात सुरू होत्या त्या बंद करण्यास १९५३ पासून सुरुवात झाली. ३१ मार्च १९६४ रोजी मुंबईत शेवटची ट्राम बोरीबंदर ते दादर अशी धावली आणि पुढे ती इतिहास जमा झाली. काही वर्षांपूर्वी मुंबईतील हुतात्मा चौकाच्या ठिकाणी रस्त्याच्या खोदकामाप्रसंगी ट्राम ज्या ट्रॅकवरून धावत असे त्या ट्रॅकचे काही अवशेष आढळून आले होते.


हेही वाचा – लोकलला मेट्रोचा पर्याय; मुंबई मेट्रो लाईन २ ए आणि ७ मुंबईत दाखल

 

 

 

 

- Advertisement -