जिम, ब्युटीपार्लर ५० टक्के क्षमतेत खुली राहणार

Gym, beauty parlor will be open at 50% capacity

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी जारी केलेल्या निर्बंधात रविवारी सुधारणा करण्यात आली. जाहीर निर्णयात ब्युटीपार्लर आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय होता. परंतु आज जारी केलेल्या सुधारित आदेशात ब्युटीपार्लर आणि जिमला ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे.
आजच्या सुधारित निर्णयाप्रमाणे जिम आणि ब्युटी सलूनमध्ये मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जाणार आहेत. याचसोबत जिम, ब्युटी सलूनमधील कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.
दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली असून योग्य कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत

काय आहेत निर्बंध?

पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही
रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही
लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
चित्रपटगृह, नाट्यगृह ५० टक्के उपस्थितीची मुभा.
सलून आणि खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा, खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू करावे
पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास मुभा, हॉटेल, रेस्तराँ रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार
महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक
हॉटेल्स रेस्तराँमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार, २४ तास सुरू राहणारे कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार
दुकाने, हॉटेल्स रेस्तराँमध्ये काम करणार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या असणे बंधनकारक, लसीचे दोन डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्तराँवर कारवाई केली जाणार.
स्विमिंग पूल, स्पा पूर्णतः बंद