‘ती’ दान करण्यासाठीच वाढवते केस

सलग दोन वेळा तिने केले केसदान

Hair donate

लांबसडक केस हे बाईचे सौंदर्य असते, असे म्हटले जाते. जर केस नसतील तर अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. पण, या सर्व गैरसमजांना किंवा भीतीला अपवाद ठरली मुंबईतील एक तरुणी. गेल्या अनेक वर्षांपासून ही तरुणी केस दान करण्यासाठीच वाढवतेय. गौतमी जाधव असे या २० वर्षीय तरुणीचे नाव असून ती गेली ३ वर्ष आपण या समाजाला काहीतरी देणे लागतो या दृष्टीकोनातून काम करतेय.

दादरच्या गौतमीने कॅन्सर रुग्णांसाठी दुसर्‍यांदा केस दान केले आहेत. २०१६ ला जसलोक हॉस्पिटलने महिला दिनानिमित्त राबवलेल्या एका शिबिरादरम्यान गौतमीने पहिल्यांदा केस दान केले होते. त्यानंतर, तीन वर्षांनी पुन्हा एकदा गौतमीने आपले केस वाढवून कॅन्सर रुग्णांसाठी दान केले. मुंबईतील ‘कोप विथ कॅन्सर’ या संस्थेद्वारे गौतमीने १९ मे २०१९ या दिवशी दुसर्‍यांदा केस दान केले आणि तसा फोटो सोशल मीडियावर टाकला. गौतमीने उचललेल्या या पावलामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गौतमीने जेव्हा पहिल्यांदा केस दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती १६ वर्षांची होती. आपल्याला केस दान करायचे आहेत असे जेव्हा गौतमीने तिच्या आई-वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनीही तिला पाठींबा दिला आणि तिने पहिल्यांदा केस दान केले.

गौतमीच्या म्हणण्यानुसार, एखाद्याला मदत करायची म्हणून अनेकदा लोक पैसे, कपडे दान करतात. हल्ली अवयवदानाबाबतची जनजागृती वाढली असल्याकारणाने थोड्याप्रमाणात लोक अवयवदान करण्यासाठीही पुढाकार घेतात. पण, जे लोक कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंज देतात अशा लोकांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा मी १६ वर्षांची होते तेव्हा मी न्यूजपेपरमध्ये एक जाहिरात पाहिली होती. महिला दिनानिमित्त जसलोक हॉस्पिटलतर्फे कॅन्सर रुग्णांसाठी केस दान करण्यासाठी मोहिम राबवली गेली होती. त्यावेळेस मी माझ्या आई-वडिलांना पहिल्यांदा केस दान करण्याबाबत सांगितले. आई-वडिलांनीही मला यासाठी पाठींबा दिला. तेव्हा मी बॉयकट केला होता आणि आता ३ वर्षांनी मी पूर्ण केस दान केले, ज्याचा मला आनंद होतो. लोक माझे अभिनंदनही करतात पण, लोकांनी खरंतर अशा रुग्णांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पैसे तर लोक दान करतात पण, आपण समाजाला काही देणे लागतो यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

दान केलेल्या केसांचे तयार करतात विग
कोणत्याही व्यक्तीने दान केलेल्या केसांचे विग तयार केले जाते आणि ज्यांना केसांची गरज असते त्यांना ते विग उपलब्ध करुन दिले जाते. ‘मदत’ संस्थेच्या वेबसाईटवर केस कसे आणि कुठे पाठवायचे? याची माहिती दिली आहे. त्यानुसार, केस नीट बांधून ते एका बॅगमध्ये ठेऊन ते स्पीडपोस्टने त्यांच्या कार्यालयात पाठवायचे असतात. त्यानंतर, संस्थेतर्फे मेसेज पाठवला जातो. त्यानुसार, केस पोहचले की नाही ते आपल्याला ही कळते.

मी जेव्हा पहिल्यांदा केस दान करण्यासाठी गेले होते तेव्हा मी एका महिलेला पाहिले होते. जेमतेम ५० वर्षांची ती महिला होती आणि त्या महिलेचे केस लांबसडक होते. मी तिला विचारले की तुम्ही एवढे मोठे केस का कापलेत? तर त्यांनी मला सांगितले, मी कॅन्सर रुग्णांसाठी केस दान केले. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी होता, असा ही अनुभव गौतमीने शेअर केला आहे.
– गौतमी जाधव, केस दान करणारी तरुणी