अखेर दिव्यांग तरुणाला मिळाला न्याय!

जन्मापासूनच ‘सेरेब्रल पल्सी’ या आजारामुळे ग्रासल्याने पुष्कर गुळगुळे याला शालेय जीवनापासूनच विविध संकटांना तोंड द्यावे लागले होते. नियमांचा बागुलबुवा दाखवून आरटीओ अधिकार्‍यांनी त्याला वाहन परवाना नाकारला होता, पण अखेर सलग दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर वाहन चालवीत कॉलेजला जाण्याचे पुष्करचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.

handicapped youngster
दिव्यांग पुष्कर गुगळे

दिव्यांग म्हणून जन्माला येऊनसुद्धा आपल्या हिमतीवर सर्वसामान्य मुलांच्या तोडीस तोड शिक्षण घेऊन पुष्करने पदवी मिळवली. नियमांचा बागुलबुवा दाखवून आरटीओ अधिकार्‍यांनी त्याला वाहन परवाना नाकारला, पण अखेर पुष्कर व त्याच्या कुटुंबियांच्या लढ्यासमोर त्यांना झुकावे लागले. सलग दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर वाहन चालवीत कॉलेजला जाण्याचे पुष्करचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.

जन्मापासूनच ‘सेरेब्रल पल्सी’ या आजारामुळे ग्रासल्याने पुष्कर गुळगुळे याला शालेय जीवनापासूनच विविध संकटांना तोंड द्यावे लागले होते. मात्र तरीही त्या सर्व शारीरिक अडचणींचा मोठ्या आत्मविश्वासाने सामना करुन पुष्करने पदवीदेखील मिळवली. पद्व्युत्तर पदवी मिळविण्यासाठी तसेच कोणाच्याही मदतीशिवाय घर ते कॉलेज असा प्रवास स्कूटरवरुन करावा म्हणून त्याने अंधेरी आरटीओ येथे शिकाऊ चालक परवाना मिळावा म्हणून अर्ज केला. मात्र आरटीओ अधिकार्‍यांनी परवाना नाकारताना दिलेल्या सल्ल्यामुळे पुष्करचे वडील विनायक गुळगुळे यांना धक्का बसला.

अपंग मुलाला वाहन परवाना देऊन मृत्यूच्या दाढेत ढकलायचे आहे का तुम्हाला? असा अजब प्रश्न ऐकून,अपंगत्वावर मात करुन सर्वसामान्य मुलांप्रमाणे स्वतंत्रपणे जगू पाहणार्‍या पुष्करचे वडील विनायक गुळगुळे यांना धक्का बसला. मात्र जिद्द न सोडता त्यांनी सतत दोन वर्षे आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवले. पत्नी नूतन यांची साइड कार असलेल्या स्कूटरवर टेस्ट देण्याची तयारी दाखवूनदेखील आरटीओ अधिकार्‍यांनी पुष्करच्या नावावर नवीन साइड कार असलेली स्कूटर खरेदी करा त्यानंतरच परवाना देण्याबाबत विचार करता येईल असा सल्ला दिला. तसेच दिव्यांग व्यक्तिच्या मालकीची तसेच पुष्करची बाब केंद्रीय परिवहन विभागाकडे पाठविल्याचे सांगितले.

पुष्करच्या वडिलांनी अंधेरी आरटीओ प्रमुख अभय देशपांडे यांची भेट घेऊन पुष्करची व्यथा सांगितली. त्यांच्या विशेष प्रयत्नाने व पुष्करची नवीन साइड कार असलेली स्कूटर या बाबी लक्षात घेऊन पुष्करला शिकाऊ वाहन चालक परवाना देऊन त्याच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींसाठी परिवहन विभागाने केलेल्या क्लिष्ट नियमांमध्ये सुलभता आणण्याची मागणी विनायक गुळगुळे यांनी केली आहे.-महेश पावसकर । मुंबई