घरदेश-विदेशदक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा मुंबईत दाखल

दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा मुंबईत दाखल

Subscribe

कोकणातील हापूस आंब्याने मुंबईतील घाऊक बाजारपेठांवर वर्षानुवर्षे अधिराज्य केल्यानंतर आता त्याच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा उतरला आहे. कोकणातल्या हापूसच्या अगोदरच दक्षिण आफ्रिकेतील हापूस एपीएमसी मार्केट मध्ये दाखल होत असल्याने व्यापार्‍यांचेही लक्ष त्या आंब्याकडे लागले आहे. तो कसा आहे,त्याची चव कशी आहे याची काहीही माहिती नसून तो आमच्या ताब्यात आल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्याचवेळी त्याचे दरही ठरवण्यात येतील असे यावेळी फळ मार्केटमधील आंब्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. रविवारीच हा आंबा मुंबई विमानतळावर येऊन धडकला आहे. कोणत्याही क्षणी तो मार्केटमध्ये दाखल होऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा प्रथमच मुंबईतल्या मार्केटमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. रविवारी आफ्रिकेतील सुमारे २०० डझन हापूस आंबे मुंबई विमानतळावर दाखल झाले असून ते कस्टमच्या तावडीत अडकले आहेत. बुधवारी हे आंबे मार्केटमध्ये दाखल होतील, अशी अपेक्षा व्यापार्‍यांना होती. मात्र संध्याकाळपर्यंत कस्टमकडून कोणताही अधिकृत दुजोरा न मिळाल्याने व्यापार्‍यांच्या अपेक्षा मावळल्या आहेत. वाट बघण्याशिवाय आता कोणताही पर्याय राहिला नसल्याचे पानसरे यांनी सांगितले.

- Advertisement -

भारतातील आंबा खवय्यांची चव भागविण्यासाठी पहिल्यांदाच परदेशातून हापूस आंबा मुंबईत येत आहे.विशेष म्हणजे रत्नागिरीतून कलम करून नेण्यात आलेला हा हापूस आंबा चवीला व आकाराला कोकणातील हापूस आंब्यासारखाच असून कोकणातील आंबा बाजारात येण्यापूर्वी तीन महिने आधीच तो विक्रीला येत आहे. त्यामुळे तो कोकणातील हापूस आंब्याला टक्कर वगैरे देण्याचा प्रश्न येत नाही.

दक्षिण आफ्रिकेतील वाहतूक आणि मशागत पाहता हा हापूस आंबा मुंबईच्या बाजारात दोन हजार रुपये प्रति डझन विकला जाण्याची शक्यता आहे. कोकणातील हापूस आंब्याची खरी बाजारपेठ ही आखाती देशात आहे. याच कोकणातील हापूस आंब्याची रोपे व कलम नेऊन अनेकांनी आपल्या देशात बागा फुलवल्या आहेत. देवगडमधील हापूस आंब्याची लागवड होत असताना दक्षिण आफ्रिकेतील शेतकर्‍यांनीही कोकणातील हापूस आंब्याचा प्रयोग करण्याचा निश्चय करून जून २०११ पासून कलम हापूस आंब्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेच्या लिलॉण्डवेमधील मलावी प्रदेशात ही हापूस आंब्याची लागवड मलावी मॅन्गोज ऑपरेशन लिमिटेड या कंपनीने केली आहे. त्यासाठी ६०० एकर जमीन भाडेपट्ट्यावर घेण्यात आलेली आहे. तेथील वातावरण हे रत्नागिरीच सारखे आहे. त्यामुळे मागील आठ वर्षांत येथील ६० हजार रोपांना चांगलाच भर आला आहे. यातील १५ हजार झाडावरील आंबे पिकण्यायोग्य झाल्याने २०० डझन हापूस आंब्याच्या पेट्या तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जाणार आहेत.

हवाई वाहतूक खर्च आणि तेथील मशागत पाहता मुंबईतील बाजारात हा हापूस आंबा १८०० ते २००० रुपये प्रति डझन विकला जाण्याची शक्यता आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केली. पानसरे यांना हा मलावी दक्षिण आफ्रिकन हापूस आंबा विकण्याचा पहिला मान मिळालेला आहे. ३०० ग्रॅम वजनाच्या या हापूस आंब्याची साल व चव कोकणातील हापूस आंब्यासारखीच असल्याचा दावा केला जात आहे.

दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा हा रविवारी मुंबई विमानतळावर येऊन ठेपला आहे. प्रथमच इतर देशातील हापूस आंबा आपल्या देशात येत असल्याने कस्टम कडून अनेक तपासण्या सुरु आहेत.त्यानंतर या आंब्याला भारतात येण्यास कोणताही विलंब लागणार नाही. प्रथम फेरीत २०० डझन आंबा आला असून त्याच्या प्रतिसादानंतर तो पुन्हा मागवला जाणार आहे.
-संजय पानसरे :- फळ विक्रेता,एपीएमसी फळ मार्केट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -