घरमुंबईडोळ्यादेखत हर्षल वाहून गेला...

डोळ्यादेखत हर्षल वाहून गेला…

Subscribe

मंगळवारी रात्री नाल्यात हर्षल जिमकर हा २३ वर्षीय तरुण पडला. वाचवा वाचवा म्हणून त्याने आरडाओरड केली. सगळ्यांचे लक्षही वेधले. अग्निशमन दलाकडून शोध  सुरु आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदीवली नाला दुथडी भरून वाहत होता. मंगळवारी रात्री नाल्यात हर्षल जिमकर हा २३ वर्षीय तरुण पडला. वाचवा वाचवा म्हणून त्याने आरडाओरड केली. सगळ्यांचे लक्षही वेधले. पण पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे सगळेच हतबल ठरले. आणि सगळ्यांच्या डोळ्यांदेखत हर्षल वाहून गेला. तब्बल २० तास उलटले; पण अजूनही तो बेपत्ता आहे. रात्रीपासूनच कल्याण आणि ठाण्यातील पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे.

अकाऊंटच्या क्लाससाठी गेलेला  घराबाहेर

डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरातील जय मुक्ता सोसायटीत तिसर्‍या मजल्यावर रमेश जिमकल यांचे कुटुंब राहतात. हर्षल त्यांचा सर्वात धाकटा मुलगा. मंगळवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेसहा वाजता अकाऊंटच्या क्लाससाठी घराबाहेर पडला होता. क्लास सुटल्यानंतर हर्षल घरी परतताना, नाल्याजवळ लघु शंका करण्यासाठी गेला असतानाच, तो नाल्यात पडला. हर्षल नाल्यात पडला त्यावेळी वाचवा वाचवा असे ओरडला. रस्त्यावरचे लोक, दुकानदार सगळ्यांनी त्याचा आवाजही ऐकला. पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की कोणीही त्याला वाचू शकले नाही. तो पाण्याच्या प्रवाहबरोबर वाहून गेला, असे प्रत्यक्षदर्शी मंगेश कनोजिया यांनी सांगितले.

- Advertisement -

अग्निशमन दलाकडून शोध 

सुरुवातीला हर्षलला वाचविण्यासाठी मित्राने उडी घेतल्याने दोघेजण वाहून गेल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली होती. मात्र दुसरा कोण याविषयी सगळेच संभ्रमात आहेत. मंगळवारी रात्रीपासून अग्निशमन दलाकडून हर्षलचा शोध सुरू आहे. बुधवारी केडीएमसी बरोबर ठाणे महापालिकेची एक टीमही शोध कार्यात उतरली. तसेच खडवली येथील अट्टल पोहणार्‍या मुलांच्या टीमनेही प्रत्यक्ष नाल्यात उतरून शोधाशोध केली. नांदिवली नाला हा पुढे दिवा खाडीला मिळतो. त्यामुळे हर्षल प्रवाहाबरोबर वाहत गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

आईचे हर्षलच्या वाटेकडे डोळे 

नाल्यात पडून हर्षल वाहून गेल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळलीय. पण वडीलांना अजूनही सांगण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपूर्वीच वडिलांची बायपास झालीय. हर्षलची आई मुलाच्या आठवणीने रडत आहे. माझा हर्षल परत कधी येईल याकडे तिचे डोळे लागलेत. हर्षलला मोठा भाऊ असून, बहिणीचे लग्न झालेय. ही माहिती कळाल्यानंतर ती सुद्धा घरी आलीय. मंगळवारी पाऊस जोरदार पडत होताच. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हर्षल पाठीवर सॅक अडकवून क्लासला निघाला. आम्हाला त्याने बायबायही केले. आणि अवघ्या दोन तासांत हर्षल नाल्यात पडल्याची बातमी कानी पडली आणि धक्काच बसला, असे हर्षलचे शेजारी राहणारे विलास राणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -