Eco friendly bappa Competition
घर मुंबई विशाल ठक्करला शोधणार हवालदार पांडे

विशाल ठक्करला शोधणार हवालदार पांडे

Subscribe

मालाड पोलिस ठाण्याचे राजेश पांडे, मागील अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या विशाल ठक्करचा शोध घेणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत पांडे यांनी थोडेथाडेके नव्हेतर ७०० बेपत्ता माणसांना शोधून काढले आहे.

एखाद्या गुन्ह्याचा तपास आणि गुन्हेगार यांना शोधून काढण्यात स्कॉडलँड पोलिसांचा आजही एक नंबर आहे. त्यानंतर आपल्या मुंबई पोलिसांचा दुसरा नंबर लागतो. मात्र अडीच वर्षांपासून हरवलेल्या एका चित्रपट अभिनेत्याला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची दमछाक झाली आहे. त्यामुळेच सीआयडीच्या एसीपी प्रद्युमन आणि दयाची मदत घ्यायची की आपल्याच पोलीस दलात काम करणार्‍या पोलीस हवालदार राजेश पांडेना मिशनवर पाठवावे, या विवंचनेत मुंबई पोलिस होते. अखेर मालाड पोलिस ठाण्याचे राजेश पांडे, मागील अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या विशाल ठक्करचा शोध घेणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत पांडे यांनी थोडेथाडेके नव्हेतर ७०० बेपत्ता माणसांना शोधून काढले आहे.

सिनेअभिनेता विशाल ठक्कर गेला तरी कुठे?

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रटात प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने आत्महत्या प्रयत्न केल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे दृष्य तुम्हाला आठवत असेल. या दृष्यातील अभिनेता विशाल महेंद्र ठक्कर (३१) हा गेल्या ३१ डिसेंबर २०१५ पासून बेपत्ता आहे. मात्र अडीच वर्षांपासून विशालचा शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले नाही. तपासात पोलिसांकडून होणार्‍या हलगर्जीपणामुळे ठक्कर कुटुंबियांची प्रचंड निराशा झाली आहे. आपला मुलगा नक्कीच घरी येईल अशी आशा विशालची आई दुर्गा ठक्कर यांना असून तो सहीसलामत घरी परत यावा यासाठी त्या नेहमीच देवाकडे प्रार्थना करतात. काही दिवसांपूर्वी दुर्गा ठक्कर यांनी पोलीस हवालदार राजेश पांडे यांची भेट घेऊन विशालला शोधून काढण्याची विनंती केली आहे. पांडे यांनीही, आपण विशालला लवकरात लवकर शोधून काढू, असा शब्द विशालच्या आईला दिला आहे. त्यामुळे दुर्गा ठक्कर यांना त्यांच्याकडून प्रचंड आशा आहे.

कोण आहे विशाल ठक्कर

- Advertisement -

चाँदनी बार, टँगो चार्ली, मुन्नाभाई एमबीबीएस आदी चित्रपटासह काही हिंदी मालिकांमध्ये विशाल ठक्कर याने काम केले आहे. चाँदनी बार आणि मुन्नाभाई एमबीबीएसमधील त्याच्या भूमिकेची सर्वांनीच प्रशंसा केली होती. त्यामुळे अल्पावधीत त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

कधी बेपत्ता झाला

३१ डिसेंबर २०१५ रोजी विशाल हा चित्रपट पाहण्यासाठी घरातून निघून गेला, रात्री उशिरा घरी आला नाही म्हणून त्याच्या आईने त्याला फोन केला. यावेळी त्याने आपण थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मित्रांसोबत जात असल्याचे सांगून सकाळी येतो असे सांगितले. मात्र दुसर्‍या दिवशी तो घरी आलाच नाही. त्यानंतर ठक्कर कुटुंबियांनी विशालचा सर्वत्र शोध घेतला, मित्रमंडळी, नातेवाईक आदीकडे चौकशी केली, मात्र तो कुठेच नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली होती. त्याचा फोटो आणि संपूर्ण तपशील असलेला मजकूर असलेले पोस्टर्सही विविध पोलीस ठाण्यात व परिसरात लावले. इतकेच नव्हे तर विशालची माहिती देणार्‍या व्यक्तीला योग्य ते बक्षीस दिले जाईल असेही जाहीर केले. मात्र अडीच वर्ष उलटूनही अद्याप विशाल सापडला नाही.

प्रेमसंबंध की अजुन काही ?

- Advertisement -

विशालचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. काही महिने ते दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहिले होते. मात्र त्यांच्यात वाद झाला आणि या तरुणीने त्याच्याविरुद्ध मारहाणीसह लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक झाली होती. याच गुन्ह्यात नंतर विशालला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर या तरुणीनेही विशाल विरोधातील केस मागे घेण्याची तयारी दर्शविली होती. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच्या याच तरुणीच्या घराजवळ होते, मात्र पंधरा दिवसांनी त्याचा मोबाईल बंद झाला होता.

मुलुंडच्या स्वप्ननगरी, स्वप्न संजित अपार्टमेंटमध्ये दुर्गा ठक्कर या त्यांचा पती, मुलगा आणि सूनेसोबत राहत होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते कांदिवली, चारकोपमध्ये राहायला आल्या आहेत. विशाल बेपत्ता झाल्यामुळे मुलुंड पोलिसांसह मिसिंग पर्सन ब्युरो आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची त्यांनी भेट घेतल्याचे त्या सांगतात. सर्वांनी विशालला शोधून काढण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप विशाल सापडला नाही. तो कुठे आहे, जिवंत आहे का, अडीच वर्ष उलटूनही त्याने एकदाही कोणालाही संपर्क साधला नाही. पोलिसांकडून हवा तसा प्रतिसाद ठक्कर कुटुंबियांना मिळत नसल्याने दुर्गा ठक्कर यादेखील काहीशा निराशा झाल्या आहेत.

मी हार मानलेली नाही. एक दिवस विशाल घरी नक्की येईल. दाराची बेल वाजली की अजूनही त्यांना विशाल तर आला नाही ना, असे वाटते. त्यासाठी त्या देवाकडे प्रार्थना करीत आहेत. विशाल कुठेही असो, पण सुखरुप असो, अशा भावना त्यांनी ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केल्या. पांडे यांनी माझ्या विशालला शोधून काढण्याचे आश्वासन दिले असून त्यांच्या भेटीनंतर विशालविषयी काहीतरी माहिती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
-दुर्गा ठक्कर, विशालची आई

कोण आहेत राजेश पांडे

सध्या मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले राजेश पांडे हे ५१ वर्षांचे आहेत. १९३३ साली ते पोलीस शिपाई म्हणून मुंबई पोलीस दलात रुजू झाले. गेल्या २५ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी पोलीस मुख्यालय, ल-विभाग, गुन्हेत शाखा काम केले आहे. २०११ रोजी त्यांची सांताक्रुज पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. तिथे गुन्हे शाखा आणि तडीपार विभागात कार्यरत असताना त्यांनी मिसिंग व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांना याकामी ठेवण्यात आले आहे. सध्या ते मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत असून तिथे त्यांना चार वर्ष पूर्ण झाली आहे.

सातशेहून अधिक मिसिंग व्यक्तींचा घेतला शोध

२०११ पासून त्यांनी सातशेहून अधिक मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला आहे. त्यात बहुतांश वयोवृद्धासह अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अनेकदा मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांना बँकाँकसह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, गुवाहाटी, गोवा, मध्य प्रदेशसह इतर राज्यात जावे लागले होते. त्यांच्या कामाचे वरिष्ठांनी नेहमीच कौतुक केले. त्यांना अलीकडेच माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्याकडून गौरविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांना काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

मिसिंग स्पेशलिस्ट

मिसिंग स्पेशलिस्ट म्हणूनही राजेश पांडे हे मुंबई पोलीस दलात परिचित आहेत. आतापर्यंत ७०० हून अधिक व्यक्तींना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आले, या कामात आपल्याला नेहमीच आनंद मिळतो. ‘बिछडो को मिलाने जैसा काम नही ’असे ते गर्वाने सांगतात. पोलीस सेवेत असेपर्यंत आणि निवृत्त झाल्यानंतरही आपण ते काम करणार असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले. आतापर्यंत सातशेहून अधिक मिसिंग व्यक्तींना शोधून काढण्याचा त्यांचा रेकार्ड आगामी काळात कोणी तोडू शकणार नाही.

- Advertisment -