Eco friendly bappa Competition
घर मुंबई व्यवसायाने लिंबू विक्रेता, पण धंदा कारटेप चोरीचा

व्यवसायाने लिंबू विक्रेता, पण धंदा कारटेप चोरीचा

Subscribe

लिंबू विकण्याच्या बहाण्याने कार हेरायची आणि तिची काच फोडून कार टेप चोरी करायची. मात्र कुठेही सीसीटीव्हीत येणार नाही, याची काळजी घ्यायची, अशा सराईत कार टेप चोराच्या मुसक्या मलबार हिल पोलिसांनी आवळल्या आहेत. विनोद अशोक पवार असे या चोराचे नाव आहे. तो मूळचा लिंबू विक्रेता असून आतापर्यंत तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र त्याचे हे आव्हान पोलिसांनी पेलले आणि विनोदने केलेली एक चूक त्याला अखेर भोवली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या बर्‍याच भागातल्या कारमधून कार टेप चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाल्याच्या तक्रारी येत होत्या. मलबार हिल परिसराबरोबरच इतर भागातल्या अनेक पोलीस ठाण्यामध्ये कारटेप चोरीच्या तक्रारींची नोंद करण्यात आली होती. मलबार हिल पोलिसांच्या पथकाने उत्तम कामगिरी बजावून या कार टेप चोरणार्‍या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याने मलबार हिल परिसरातून 9 आणि 10 ऑगस्ट या दोन दिवसात इनोव्हा कारची काच फोडून 11 हजार रुपयांची कार टेप लांबवली होती. याआधीही त्याने चोर्‍या केल्या होत्या. पण त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये त्याची नोंद उपलब्ध झालेली नव्हती. पण यावेळी तो सीसीटीव्हीत अडकला आणि पोलीस पथकाने त्याला पकडले. चोरी केलेल्या कार टेप पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले कार टेप चोरीचे गुन्हे उघडकीस येणार आहेत. विनोद अशोक पवार (35) असे चोरट्याचे नाव आहे आणि तो मालाडमध्ये राहतो. एका बाजूला तो लिंबू विक्रीचा धंदा करतो, पण दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून तो वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केलेल्या कारमधील कार टेप चोरी करून त्या अन्यत्र विकायचा.

9 आणि 10 ऑगस्ट या दोन दिवसात विनोदने साथीदाराच्या मदतीने मलबार हिल परिसरात उभ्या असलेल्या इनोव्हा कारची काच फोडून 11 हजार रुपयांची पायोनियर कंपनीची कार टेप लांबवली. या प्रकरणी कार मालकाने तक्रार देताच मलबार हिल पोलिसांनी (गु. र. क्र. ५५/१८) भादंवि कलम ३७९, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. वाढत्या कार टेप चोरीचे प्रमाण पाहता चोरट्याला तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिले. पवारला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हे करण्याचा फंडा सांगितला. एफझेड दुचाकीवर येऊन साथीदाराच्या मदतीने खास करून इनोव्हा कारच्या काचा फोडून कार टेप लांबवायचा, अशी माहिती त्याने तपासात दिली.

- Advertisement -

अशाप्रकारे याआधीही त्याने साथीदाराच्या मदतीने मुंबईतील जुहू, मालवणी, बांगुर नगर, डोंगरी, सर जे. जे. मार्ग, चारकोप, भोईवाडा, विलेपार्ले आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारटेप चोरल्याचे उघड झाले आहे. विनोद पवार सध्या न्यायालयीन कोठडीत असून संबंधित पोलीस ठाणे त्याचा ताबा घेऊन गुन्ह्यांची उकल करणार आहेत. कारटेप चोरट्याला अटक करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने उत्तम कामगिरी बजावली आहे.

झटपट पैसे मिळवण्यासाठी  चोरीचा धंदा..

विनोद अशोक पवार हा मालाड पश्चिम भागात असणार्‍या मालवणी,अंबुजवाडी झोपडपट्टीत राहत होता. व्यवसायाने लिंबू विक्रेता असल्यामुळे मालाड परिसरात अनेक सिग्नल्सवर तो लिंबू विकायचा पण या व्यवसायातून मिळालेल्या तुटपुंजा पैशावर काही भागत नसल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला असे पोलिसांचे म्हणणे आहे. जुहू, मालवणी, बांगूर नगर , डोंगरी , सर जेजे मार्ग, चारकोप, विलेपार्ले आणि भोईवाडा पोलीस ठाण्यातसुद्धा त्याच्यावर कारटेप चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गुन्ह्याची त्याने कबुली दिलेली आहे. सध्या पोलीस कोठडी भोगत असलेल्या पवारला यापुढे ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या कित्येक भागात घडलेल्या अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल होणार असल्याचा दावा मलबार हिल पोलिसांनी केला आहे. मलबार हिल परिसरात असलेल्या इनोव्हा गाडीतला कार टेप चोरी करताना आरोपीने एफझेड या दुचाकी गाडीचा वापर केला होता. त्याच्यासोबत असणार्‍या सहकार्याचे नाव पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही.

- Advertisement -

मुंबईतल्या अनेक भागात हा चोरटा अगदी शिताफीने कार टेप चोरी करत होता. याआधीही अशा प्रकारच्या तक्रारी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या होत्या. ९ आणि १० ऑगस्ट या दोन दिवसात मलबार परिसरातील गाडीतल्या कार टेप चोरल्या होत्या. चोरी झाल्यानंतर मिळालेल्या तक्रारीनुसार आम्ही तपास सुरु केला आणि सीसीटीव्हीमध्ये मोटारसायकलवरून येऊन गाडीची काच फोडतानाचे फुटेज मिळाले. त्यावरून आम्ही आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने वेगवेगळ्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. पुढील तपास सुरु आहे.
– विनोद कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मलबार हिल पोलीस ठाणे

- Advertisment -