आपलं घर, जे आपल्यासाठी सुरक्षिततेचं आणि आरामाचं ठिकाण असतं त्यातीलच काही वस्तू मात्र आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. आरोग्याबाबतीतला सर्वात मोठा धोका म्हणजे कर्करोग. अनेक वेळा, आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी, ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही त्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, जो अनेक कारणांमुळे होऊ शकतो. अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्यांचा आपण जवळपास रोज वापर करतो, परंतु त्या कर्करोगाचा धोका वाढवतात.
नॉन-स्टिक कुकवेअर :
नॉन-स्टिक कुकवेअरमध्ये टेफ्लॉन नावाचे रसायन असते. जेव्हा ही भांडी जास्त गरम केली जातात तेव्हा हे रसायन हवेत विरघळते आणि आपण श्वास घेत असताना आपल्या शरीरात प्रवेश करू शकते. या रसायनामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
प्लास्टिकची भांडी आणि बाटल्या :
प्लास्टिकची भांडी आणि बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे रसायन असते. जेव्हा गरम अन्न किंवा द्रव प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवले जाते तेव्हा हे रसायन अन्नामध्ये मिसळते आणि त्यांच्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करू शकते. बीपीए रसायन हे स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि हृदयविकाराशी संबंधित आहे .
ॲल्युमिनियम फॉइल :
ॲल्युमिनियम फॉइलचा वापर अन्न पॅक करण्यासाठी आणि शिजवण्यासाठी केला जातो, परंतु ॲल्युमिनियम फॉइलमध्ये असलेले ॲल्युमिनियम आपल्या शरीरात जमा होऊ शकते आणि अल्झायमर किंवा पार्किन्सन सारख्या आजारांचा तसेच कर्करोगाचा धोका यामुळे वाढू शकतो.
प्लास्टिक चॉपिंग बोर्ड :
प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वारंवार वापरल्यामुळे, ते स्क्रॅच होतात. यावर कापलेले अन्न स्क्रॅचमध्ये अडकते. ज्यामुळे बॅक्टेरिया अशा स्क्रॅचेसमध्ये अधिक सहजपणे वाढतात. याव्यतिरिक्त, प्लास्टिकचे अतिशय बारीक तुकडे देखील आपल्या अन्नात प्रवेश करू शकतात. या बोर्डमध्ये असलेली रसायनेही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
शुद्ध साखर :
शुद्ध साखर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणा हा अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. याव्यतिरिक्त, साखर इन्सुलिनची पातळी वाढवते ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना मिळते.
चहाची पिशवी :
चहाच्या पिशव्यांमध्ये एपिक्लोरोहायड्रिन नावाचे रसायन असते, जे गरम पाण्यात विरघळते आणि त्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
पेंट आणि साफसफाईची उत्पादने :
बऱ्याच पेंट्स आणि साफसफाईच्या उत्पादनांमध्ये बेंझिन, फॉर्मल्डिहाइड आणि टोल्यूइन सारखी धोकादायक रसायने असतात, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत त्यांच्या संपर्कात राहणाऱ्यांना कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
मेणबत्त्या :
काही प्रकारच्या मेणबत्त्यांमध्ये हानिकारक रसायने असतात जी जळताना हवेत सोडली जातात. ही रसायने श्वासावाटे शरीरात घेतली गेली तर कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
घराची धूळ :
घरातील धुळीमध्ये धातू, कीटकनाशके आणि इतर रसायनांसह विविध प्रकारचे प्रदूषक असतात. या प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
कर्करोग टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
आरोग्यदायी अन्न- ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
शारीरिक हालचाली- नियमित व्यायाम करा आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा.
धूम्रपान करू नका- धूम्रपान हे कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे.
प्लास्टिकचा वापर कमी करा- प्लास्टिकऐवजी काचेची किंवा स्टीलची भांडी वापरा.
घर स्वच्छ ठेवा- घराची नियमित स्वच्छता करा आणि धूळ झाडून काढा.
नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा- शक्यतोवर रासायनिक उत्पादने टाळा आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा.
नियमित आरोग्य तपासणी- काही महत्त्वाच्या चाचण्या डॉक्टरांकडून नियमित करून घ्या.
हेही वाचा : Social Anxiety Disorder : सोशल एन्जाइटी कशी दूर कराल?
Edited By – Tanvi Gundaye