घरमुंबईमहाडमध्ये मुसळधार पावसाचा कहर

महाडमध्ये मुसळधार पावसाचा कहर

Subscribe

सावरट रस्ता गेला वाहून

गेला आठवडाभर मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने पूरस्थिती तशीच असून तालुक्यातील विविध गावांमध्ये घरे कोसळून वित्तहानी झाली. तर दुर्गम भागातील सावरट गावाकडे जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने जवळपास सहा गावांचा संपर्क तुटला आहे.

पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून सातत्याने सावित्री नदीच्या पुराचे पाणी शहरात शिरत असल्याने चार दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दस्तुरी नाका, गांधारी हा परिसर पाच दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. ओहोटीनंतर कांही काळ गांधारी पूल, दादली पूल, महाड-रायगड मार्ग, म्हाप्रळ-पंढरपूर हे मार्ग खुले होत असले तरी पाऊस सुरू होताच पहिल्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे चार दिवस येथील बाजारपेठ बंद राहिली आहे. सावित्री, गांधारी, आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शेजारील भात शेतीत कायम राहिल्याने नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तेलंगे आदिवासीवाडी येथे मुक्ता गोविंद मुकणे, दाभोळ गावातील बंडू रामा नाडकर, पाचाड गावातील गोविंद भोसले, तर रायगडवाडीमधील दगडू वाडीकर यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पाचाड बौद्धवाडीमधील लता मोरे यांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी या घरांचे पंचनामे सुरू केले आहेत.

दरम्यान, किल्ले रायगड परिसरात पावसाचे भयंकर रूप पहावयास मिळत असून, या परिसरात पडत असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दूरध्वनी आणि वीज यंत्रणा कोलमडली; तर या विभागातील पाचाड-बांधणीचा माळ-सावरट हा दुर्गम मार्ग वाहून गेला आहे. बांधणीचा माळ ते सांदोशी या दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे हा मार्ग मुसळधार पावसात वाहून गेला आहे. यामुळे या विभागातील सावरट, सांदोशी, करमर, कावळे, खलई, बावळे या गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांकडे जाण्यासाठी पावसाळ्यात तरी हा एकमेव मार्ग आहे. हा सर्व भाग दुर्गम असल्याने परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा, बाजारपेठ, बँक व्यवहार आदी कामासाठी येणे कठीण झाले आहे.

- Advertisement -

रायगड-पुनाडे-निजामपूर-माणगाव मार्गावर पुनाडे गावाजवळ रस्त्यालगत भली मोठी भेग पडली आहे. जमिनीला पडलेल्या या भेगेमधून पाणी वाहत असून एकीकडे असलेल्या उतारामुळे हा रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -