घरमुंबईमुंबई थांबली

मुंबई थांबली

Subscribe

ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस,अडीच हजार लोकल सेवा रद्द, तीन्ही मार्ग ठप्प

गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर पावसाने गणरायांच्या आगमनापूर्वी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. ऐन गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पावसाची उपस्थिती गणेश भक्तांचा उत्साह काहीसा कमी करणारा ठरला. या पावसाने सलग तिसर्‍या दिवशी अर्थात बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये रौद्ररूप धारण केले. मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून आधी मध्य रेल्वे, त्यानंतर हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली. मुंबईची लाइफलाइनची ठप्प झाली. त्याचबरोबर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक बंद पडली. अशा प्रकारे मुंबई ठप्प झाली. जागोजागी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांमध्ये पाणी शिरल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने मुंबईसह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी केला असून गुरुवारीही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे

बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी तुंबल्याने बसची वाहतूक वळवण्यात आली होती. किंग सर्कल परिसरात पहाटेपासून पाणी भरल्याने वाहने बंद पडून वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. दादर- टिळक पूल, हिंदमाता जंक्शन, कुर्ला- श्रद्धा जंक्शन, माला गार्डन, बंटर भवन, बीकेसी सायन – षण्मुखानंद हॉल, एस.आय.ई.एस कॉलेज, विक्रोळी अंधेरी – एस.व्ही. रोड, अंधेरी सबवे, वडाळा सर्कल पंचायत या ठिकाणी पाणी साचले होते. वसई ते विरार रुळावर पाणी साचल्यामुळे बोरिवली पर्यंतची आणि माहिम ते माटुंगा दरम्यान पाणी साचल्यामुळे चर्चगेट ते अंधेरी दरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. नालासोपारा, विरार येथे पाणी साचल्यामुळे वसई-विरार रेल्वे वाहतूक बंद असून अंधेरी ते वसई दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू होती. माहीम ते माटुंगा येथे पाणी तुंबल्यामुळे पुढील वाहतूक ठप्प झाली होती.

- Advertisement -

कुर्ला रेल्वे स्थानक तसेच सायन ते कुर्ला, विक्रोळी ते भांडुप येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे लोकलसेवा बंद केली. परंतु ठाण्याच्या पुढे कल्याणच्या दिशेने सुरू असलेली वाहतूक दुपारी बारानंतर बंद झाली. पुढील सूचना मिळेपर्यंत अनिश्चित काळासाठी लोकल सेवा सुरू करण्यात येणार नसल्याची उद्घोषणा रेल्वे स्थानकावर होऊ लागल्याने प्रवाशांनी घराच्या मार्ग पकडला. चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामूळे सीएसएमटी ते वाशी ही हार्बर रेल्वे सेवा बंद झाली होती. मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे अनेक मंडळांची एकच धावपळ उडाली. मंडपातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते. तसेच सिद्धिविनायक मंदिर परिसरातही पावसाचे पाणी तुंबले.

दोन सफाई कामगारांचा मृत्यू
बुधवारी अतिवृष्टीमुळे मुंबई/उपनगर येथेग मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. अशा परिस्थितीत महापलिका कामगार मुंबईतील सेवा बजवून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत होते. महापालिकेच्या पी/दक्षिण विभागातील सफाई कामगार जगदीश बद्धा परमार्थ यांचे रस्त्यावर कर्तव्य बजाविताना दुपारी १२.३० वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. तसेच घनकचरा व्यवस्थापन चौकीतील दुसरे सफाई कामगार विजेंद बागडी हे पावसाच्या पाण्यात वाहून जात असताना त्याला बाहेर काढून त्वरित बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर दाखल केले तिथे नेल्यावर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशा दोन दुदैर्वी घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

आज अतिजोरदार पावसाची शक्यता
कुलाबा वेधशाळेमार्फत पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत राहतील. काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईप्रमाणेच पालघर, ठाणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातर्‍यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

एकूण १३ झाडांची पडझड
मुंबईत सकाळपासून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. संध्याकाळ पर्यंत एकूण १३ झाडे उन्मळून तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडण्याचे दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये शहर भागात तीन, पूर्व उपनगरात चार आणि पश्चिम उपनगरात सहा झाडे पडली. यामध्ये शहर भागात जुना महापौर बंगला आणि आताच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संरक्षक भिंतीवर गुलमोहराचे झाड पडून भिंत कोसळली.

कुर्लात परिस्थिती गंभीर, ४५० जणांचे स्थलांतर
मिठी नदीच्या पत्रातील पाण्याने दुपारी दीडच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे मिठी नदी शेजारी राहणार्‍या कुटुंबांना घरातून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला. येथील क्रांतीनगर येथील ४५० जणांना बाझरवाड नगरपालिका शाळेत हलविण्यात आले. एनडीआरएफ व एनएव्हीवाय आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्यासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. तर ५०० लोकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय बामनदया पाडा येथे ८०० ते ९०० लोकांना बाहेर काढले असून त्यांना स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने आय.ई.एस. शाळेत हलविले. त्यांची स्थानिक प्रतिनिधींनी केलेल्या जेवणाची व्यवस्था केली होती.

रेल्वे स्थानकासमोरील शाळांचा आश्रय
रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या १४५ महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचार्‍यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या शाळांमध्ये तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी, सतरंजी, बसण्यासाठी खुर्ची किंवा बाक इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती.

स्पीड बोटीतून एलबीएस वर लक्ष
एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने लोकांना या पाण्यातून मार्ग काढत पुढे जावे लागत होते .या मार्गावर गुडघ्याच्या वर पाणी तुंबले होते. लोक रस्त्याच्या मध्यभागातून चालत होते. त्यामुळे या रस्त्यावरुन चालताना पाण्यातून जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी अग्निशमन दलाच्या स्पीडबोट चा वापर करत मार्गावरून चालणार्‍या लोकांना मार्गदर्शन करत होते. या स्पीडबोटमधील तैनात जीवरक्षक पाण्यातून चालणार्‍या नागरिकांवर जीवरक्षक लक्ष ठेवून होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -