मुंबईत वाऱ्यासह पावसाची बरसात ; पवई येथे दरड कोसळली

 मुंबईत ६८ ठिकाणी झाडे, फांद्यांची पडझड, बेस्टच्या १० बसगाड्यांचे ब्रेकडाऊन, प्रवाशांना त्रास

heavy rain in mumbai powai landslide

हवामान खात्याने मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असताना व सुमद्रात मोठ्या भरतीमुळे ६.६८ मिटर उंचीच्या लाटा उसळत असताना बुधवारी आज वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलाच जोर दाखवला. दादर व वडाळा या भागात १०० मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडला. त्यातच पवई, हिरानंदानी येथे डोंगरालगतच्या संरक्षक भिंतीचा भाग घरावर पडल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झालेले नसले तरी प्रशासनाने तेथील परिसरातील ७ घरे खाली करून त्यातील कुटुंबियांचे नजीकच्या शाळेत व गुरुद्वारा येथे पर्यायी व्यवस्था केली आहे.
आगामी २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी ताशी ४५ ते ६५ किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पवई येथे दरड कोसळली

पवई, हिरानंदानी रूग्णालयाच्या मागील बाजूला हरीओम नगर परिसरात आज सकाळच्या सुमारास डोंगराचा काही भाग एका घरावर अचानक कोसळला. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु पालिकेने तात्काळ त्या परिसरातील ७ घरे खाली करून त्यात राहणाऱ्या नागरिकांना नजीकच्या गुरुद्वारात व शाळेत स्थलांतरित केले.

कुठे किती पाऊस ?

आज शहर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – ७९ मिमी, पश्चिम उपनगरात – ५१ मिमी तर पूर्व उपनगरात – ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, आज मुंबईत दिवसभर जोरदार पाऊस पडला. दादर – ११२ मिमी, वडाळा – १०१ मिमी, मुंबई महापालिका मुख्यालय – ९९ मिमी, विक्रोळी – ८३ मिमी, वांद्रे – ८४ मिमी, मरोळ – ७८ मिमी, अंधेरी (पूर्व) – ७२ मिमी, अंधेरी (पश्चिम) – ६४ मिमी, कूपर रूग्णालय – ५९ मिमी, चेंबूर – ७१ मिमी, मानखुर्द – ६९ मिमी, परळ – ९९ मिमी तर माटुंगा – ९९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

साचलेल्या पाण्याचा निचरा

मुसळधार पावसमुळे सायन, दादर टि.टी.,वडाळा, हिंदमाता, अंधेरी सब वे याठिकाणी काही प्रमाणात साचलेल्या पाण्याचा पालिकेने पंपाचा वापर करून जलद गतीने निचरा केला. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर जास्त परिणाम झाला नाही.

बेस्टच्या १० बसगडयांचे ब्रेकडाऊन

भर पावसात बेस्ट उपक्रमाच्या १० बस गाड्यांचे ऐनवेळी ब्रेकडाऊन झाले. त्यामुळे बसमधील प्रवाशांना त्याचा त्रास झाला. त्यांना पर्यायी दुसऱ्या बसने मार्गक्रमण करावे लागले. ब्रेकडाऊन झालेल्या बसगाड्यांची बेस्ट प्रशासनाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले.

एका दिवसात ६८ झाडे/ फांद्यांची पडझड

मुंबईत वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात शहर भागात २६ ठिकाणी, पूर्व उपनगरात – १७ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – २५ ठिकाणी अशा एकूण ६८ ठिकाणी झाडे, फांद्या यांची पडझड झाली. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही.