घरमुंबईपहिल्याच पावसात ठाण्यात पाणीच पाणी!

पहिल्याच पावसात ठाण्यात पाणीच पाणी!

Subscribe

पहिल्याच पावसामुळे ठाण्याच्या विविध भागांमध्ये पाणी साचले आहे. याशिवाय मुंबईकची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलवरही त्याचा जबरदस्त परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

पहिल्याच पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक अर्धातास उशीराने धावत आहे. त्यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच कर्जत-कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हजारो प्रवाशांना उशिराने धावणाऱ्या लोकलचा मनस्ताप सहन करावा लागला. जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल रखडत जात असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक जवळील रेल्वे रूळावरही दुपारी पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. नौपाडा येथील भक्ती मंदिर परिसरात झाड कोसळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचे नुकसान झाले. ठाण्याच्या विविध भागात विज पुरवठा खंडीत झाला.

ठाण्याच्या विविध मार्गांवर वाहतूक कोंडी

सकाळपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेचे वेळापत्रक कोलमडले. कांजूरमार्ग स्थानकाजवळ पाणी साचल्याने लोकल सेवा उशिराने सुरू होती. पावसामुळे ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील काही भागात पाणी साचले. त्यामुळे घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर कापूरबावडी ते पातलीपाडापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. कळव्याहून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या मार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सतत पडत असलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

अखेर तीन आठवड्याच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर गुरूवार संध्याकाळपासून ठाणे परिसरात पावसाचे आगमन झाले. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच कोसळलेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचून रहिवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान ठाण्यात दुपारी महाकाली तलाव, सरस्वती इंग्रजी शाळा, कामगार रूग्णालय, बी-केबीन, बाळकुम, उथळसर नाका, माजीवडा येथे पाणी साचले होते. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार महापालिका हद्दीत ४४६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे झाड कोसळणे, पाणी साचणे अशा २१ तक्रारी दाखल झाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -