धरण उशाला कोरड घशाला

कसारा मध्यवैतरणा धरणाजवळील सावरखुट वाडीवर भीषण पाणीटंचाई

मुंबई व ठाणे येथील नागरिकांची तहान भागवणार्‍या शहापूर तालुक्यातील कसारा जवळील मध्यवैतरणा धरणाजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या सावरखुट आदिवासी वाडीवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी येथील महिलांना उन्हातान्हात दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशारा अशी अवस्था येथील आदिवासींची झाली आहे .

शहापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कसारा विहिगावजवळ असणार्‍या सावरखुटवाडी ही मध्यवैतरणा धरणाच्या अगदी पायथ्याशी आहे. येथे १५ घरे असून एकूण ८० आदिवासी लोकवस्ती आहे. येथील आदिवासींना वर्षांनुवर्षे पाणीटंचाई सोसावी लागत आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी येथे विहीर अथवा बोअरवेल उपलब्ध नसल्याने घागरभर पाण्याच्या शोधात दिवसभर भटकंती करावी लागत असल्याची व्यथा येथील आदिवासी महिलांची आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी लगत असलेल्या नदी, नाले, ओव्हळावर जावे लागते तेथे डवरे खोदून पिण्याचे पाणी मिळवावे लागते उन्हाळ्यात तर येथील पाणीटंचाई उग्ररूप धारण करते वर्षांनुवर्षे येथील आदिवासींच्या नशिबी पाणीटंचाई मात्र कायम आहे.

डोळ्यासमोर पाण्याने तुडुंब भरलेले धरण दिसत असतांनाही मध्यवैतरणा धरणा लगत असलेली सावरखुटवाडीच्या महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते पाणी पाणी करीत येथील आदिवासी नागरिक पाणीटंचाई सहन करीत आहेत. दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करणारे सावरखुट वाडीतील गरीब आदिवासी पाणीटंचाईच्या संकटाने त्रस्त झाले आहेत. केवळ निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी फेर्‍या मारणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी देखील सावरखुट वाडीकडे कायम दुर्लक्ष केले आहे असा आरोप आदिवासींनी केला आहे. शासनाने वेळीच लक्ष देऊन येथील पाणीटंचाई व आदिवासींना भेडसावणार्‍या इतर दैनंदिन समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथील आदिवासी नागरिकांनी केली आहे.

आमच्या सावरखुट वाडीवर आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. वाडीवर वीज नाही. आम्ही या समस्येमुळे वर्षांनुवर्षे त्रस्त असून सरकारने आमच्या या सावरखुट वाडीवर लक्ष द्यावे व आमच्या या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे.
– सखरु वारे, स्थानिक आदिवासी, सावरखुट वाडी