घरमुंबईहायटेक चोरटे गजाआड;२९ गुन्हे उघड

हायटेक चोरटे गजाआड;२९ गुन्हे उघड

Subscribe

उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यांत घरफोडीचे प्रकार वाढले होते. अखेर या घरफोडी करणार्‍या टोळीला पकडण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.

उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यांत घरफोडीचे प्रकार वाढले होते. अखेर या घरफोडी करणार्‍या टोळीला पकडण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती, गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी दिली. हे चोरटे चोरी करण्याआधी मोबाईलवर कॉन्फरन्स कॉल घेऊन चोरीचा प्लान ठरवत होते. त्यासाठी मिटिंग घेऊन एखाद्या कंपनीच्या कामाप्रमाणे चर्चा करून चोरी केली जात असल्याचेही उघड झाले आहे.

या चोरट्यांना गजाआड केल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. या भागात दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. एका गुन्ह्यातील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सर्व गुन्हे दुपारच्या सुमारास घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी ज्या ठिकाणी घरफोडीच्या घटना झाल्या आहेत, त्या सर्व ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले. त्यानंतर संजयनगर (पठाणवाडी) मालाड येथे राहणार्‍या जुल्फीकार उर्फ राजु हसमत अली इद्रीस (२३), ब्रिजेश कुमार जगतपाल गुप्ता (२२), या दोन्ही आरोपींना बदलापूर पश्चिम येथून पोलिसांनी अटक केली. या दोघांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

- Advertisement -

घरफोड्या करताना, चार आरोपींपैकी दोन आरोपी दुपारच्या वेळेत बंद घरात घरफोडी करत होते. तर तिसरा घराखाली पाळत ठेवत असत. तर चौथा आरोपी हा सॅन्ट्रो कार घेवून दूर अंतरावर उभा राहत होता. घरफोडी केल्यानंतर कार चालवणार्‍या आरोपीला फोन करून गाडी त्या घराजवळ बोलावून तयार राहण्यास सांगितले जात होते. या सर्व घरफोड्या या सकाळी ११ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या दोन्ही आरोपींपैकी जुल्फीकार उर्फ राजु हसमत अली इद्रीस हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात काळाचौकी, भायखळा, मुंबई, वाशी, मालाड आणि बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी आणि दरोड्याचे २० गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. तो नुकताच आर्थर रोड जेलमधून जामिनावर बाहेर आला असून त्याने एक टोळी तयार करत अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, डोंबिवली आणि कोळशेवाडी या भागात एकूण २४ घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -