Eco friendly bappa Competition
घर मुंबई चायनीज लायटिंगला कोल्हापुरी ठसका

चायनीज लायटिंगला कोल्हापुरी ठसका

Subscribe

दिवाळीच्या रोषणाईसाठी बाजारपेठ सज्ज

दिवाळी म्हटलं की, सगळीकडे झगमगाट, रोषणाई. ही रोषणाई येते ती दिवाळीत घरोघरी सजवण्यात आलेल्या कंदिलांनी आणि करण्यात आलेल्या लायटिंगने. दोन वर्षांपूर्वीपर्यंत बाजारामध्ये साधारणतः ८० टक्के लायटिंगच्या माळा अथवा लायटिंगचे वेगवेगळे प्रकार हे चीनी होते. मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही बाजारपेठेमध्ये खरेदी करणार्‍या लोकांनी स्वदेशी लायटिंगच्या माळा विकत घेण्यालाच जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक दिवाळीमध्ये लायटिंग करणं हा काही ट्रेंड अथवा केवळ पारंपरिकता जपणे इतकंच नाही. तर घरामध्ये विविध रंगाचे दिवे वा लायटिंग हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात त्यामुळेच लायटिंगला अर्थात रोषणाईला दिवाळीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी चायनामेड वस्तूंचे बाहेरील आवरण तसेच कमी दर यामुळे लायटिंगच्या माळांमध्येही चायनीज वस्तूंना जास्त मागणी होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून चायनीज वस्तूंकडे कानाडोळा करण्यात येत असून स्वदेशी वस्तूंना जास्त मागणी आहे. त्यातही लायटिंगमध्ये सर्वात जास्त मागणी आहे ती म्हणजे कोल्हापुरी लायटिंग माळांना. बाजारामध्ये उपलब्ध होणार्‍या चायनीज लायटिंगला तोडीस तोड अशा या कोल्हापूरी लायटिंगच्या माळा बाजारात सध्या दिसत आहेत. इतकंच नाही तर सध्या दिवाळीमध्ये लायटिंगसाठी एलईडी लाईट्स वापरण्याचाही नवा ट्रेंड आलेला दिसत आहे. यामुळे वीजेची बचत होण्यासाठीही मदत होणार आहे. चायनीज माळा या केवळ २ ते ३ दिवस सहसा टिकतात पण कोल्हापुरी लायटिंग माळा या जास्त टिकाऊ असल्यामुळे या माळांना सध्या बाजामध्ये मागणी दिसून येत आहे.

सुरुवातीला लायटिंगच्या माळा या बल्ब लावून तयार करण्यात येत होत्या. मात्र आता या माळांमध्येही एलईडी बल्बचा वापर करून अधिक टिकाऊ आणि आकर्षक माळा तयार करण्यात आल्या असून सध्या या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. कोल्हापुरी लायटिंग असं या माळांचं नाव असून चायनीज माळांपेक्षाही जास्त चांगल्या प्रमाणामध्ये या वापरता येऊ शकतात असे भुलेश्वरमधील व्यापारी गाडा यांनी सांगितले आहे. यामध्ये मल्टी कलर, सिंगल कलर, ट्रीपल कलर अशा व्हरायटीदेखील उपलब्ध आहेत. या लायटिंगची किंमत साधारणतः ३०० रूपयांपासून सुरु होऊन ८५० च्या आसपास आहे. याशिवाय बाजारामध्ये वेगवेगळ्या लायटिंग कँडलचा पर्यायही उपलब्ध आहे. या कँडल्समुळे रांगोळीलादेखील वेगळी शोभा येऊ शकते.

- Advertisement -

याशिवाय माफक दर, आपल्या आवडेल अशी रंगसंगती, आकर्षक माळा यामुळे सध्या मुंबईमध्येदेखील या लायटिंगच्या माळांना पसंती दिसून येत आहे. दरम्यान दुकानदारांनी चिनी माल भरला असला तरीही सध्या या मालाला बाजारामध्ये जास्त उठाव नसल्याचेही गाडा यांनी आपलं महानगरला सांगितले.

- Advertisment -