घरमुंबईचार वर्षांपासून बंद असलेला 'हिमालय'पूल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल

चार वर्षांपासून बंद असलेला ‘हिमालय’पूल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल

Subscribe

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ (CSMT Station) जोडणारा हिमालय पूल (Hiamalay Bridge) आजपासून सुरू होणार आहे. चार वर्षांपूर्वी हा पूल अचानक कोसळला होता. तेव्हापासून या पुलाचे पूनर्बांधणीचे काम सुरू होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून आजपासून हा पूल नागरिकांच्या सेवेत येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील हा पहिलाच पोलादापासून तयार करण्यात आलेला पूल आहे.

हेही वाचा – हिमालय पुलाच्या लोकार्पणापूर्वीच विद्रुपीकरण

- Advertisement -

१९ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हिमालय पूल अचानक कोसळला होता. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर, अनेकजण जखमी होते. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका तत्काळ अॅक्शन मोडवर येऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. तसंच, पूलाच्या पुनर्बांधणीचेही काम हाती घेतले. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने काम रेंगाळले होते. परंतु, लॉकडाऊन उठल्यानंतर काम वेगाने सुरू करण्यात आले. अखेर, आजपासून हा पूल नागरिकांच्या सेवेत येणार आहे.

जुना पूल पूर्णतः पाडून या ठिकाणी नवा पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. जुना पूल लोखंडी होता. परंतु, आता पुलाच्या पूनर्बांधणीसाठी स्टेनलेस स्टील म्हणजेच पोलादाचा वापर करण्यात आला आहे. पोलादापासून तयार करण्यात आलेला मुंबईतील हा पहिलाच पूल आहे. मजबूत व टिकाऊ पुलासाठी ओडिशाहून मागवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे (पोलाद) १२० टनचे पाच गर्डर वापरण्यात आले असून किमान ५० वर्षे ते टिकून राहतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

या पुलाचा दररोज सुमारे ५० हजार पादचऱ्यांना फायदा होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सात कोटींचा खर्च आला असून पुलाची लांबी ३३ मीटर आणि ४.४ रुंदीचा आहे. या पुलाला नागरिकांसाठी सरकता जिनाही बसवण्यात आला आहे. परंतु, तो तुर्तास खुला करण्यात आलेला नाही. आजपासून पादचारी साध्या जिन्याचा वापर करू शकणार आहे. सहा महिन्यांत हे सरकते जिने सुरू होतील.

दरम्यान, या पुलामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. हा पूल बंद असल्याकारणाने स्थानकाजवळील भुयारी मार्गात गर्दी होत असे. तसंच रस्ता ओलांडावा लागत होता. परंतु, या पुलामुळे भुयारी मार्गातील गर्दी कमी होऊन रस्ता ओलांडण्याचा त्रासही वाचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -