घरCORONA UPDATE'हिंदमाता’ला यंदा पाणी भरणार, पण पाऊलभरच!

‘हिंदमाता’ला यंदा पाणी भरणार, पण पाऊलभरच!

Subscribe

ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिनी ही समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे काही अंशी पाणी तुंबणारच आहे.

परळ हिंदमाता परिसरातील खोलगट भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ब्रिटानिया पंपिंग स्टेशन उभारले. परंतु त्यानंतरही येथील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या राहिली. हिंदमाता ते ब्रिटानिया आऊटफॉल दरम्यानच्या पर्जन्य जलवाहिनींचे काम रखडल्याने ही समस्या कायम असली तरी यंदा ही कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात केवळ पाऊलभरच पाणी तुंबले जाणार आहे. ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिनी ही समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे काही अंशी पाणी तुंबणारच आहे. मात्र, हे पाणी १० ते १५ मिनिटांपेक्षा अधिक साचले जाणार नसल्याचा विश्वास महापालिकेच्या पर्जन्यजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हिंदमाता परिसरात साचणाऱ्या पाण्याचा कालावधी कमीत कमी राहावा यासाठी तीन वर्षांपूर्वी अभ्यास अहवालाच्या आधारे पर्जन्यजलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले होते. हिंदमाता परिसर हा जवळपासच्या इतर परिसरांपेक्षा खोल असल्याने या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास तुलनेने अधिक वेळ लागतो. परंतु या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा दुप्पट गतीने व्हावा, यासाठी मुंबई महापालिका गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा व दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून आता हिंदमाता परिसराशी संबंधित सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या पर्जन्यजल वाहिन्यांचे सक्षमीकरण करत तब्बल ८ हजार २०२ फूट लांबीच्या अर्थात सुमारे २.५ किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांचे पुनर्बांधकाम आणि अतिरिक्त वाहिन्यांचे बांधकाम करण्यास हाती घेण्यात आले होते. या बांधकामांच्या आड काही झाडे येत असल्याने वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीअभावी या कामाला विलंब झाला होता. परंतु हे काम आता पूर्ण झाल्याने याचा परिणाम यंदाच्या पावसाळ्यात दिसून येणार आहे.

- Advertisement -

हिंदमाता परिसराची भूभागपातळी ही सरासरी सुमारे २७.६७ मीटर टी.एच.डी. असून त्याभोवतालच्या परिसराची भूभागपातळी सुमारे ३५.०० मीटर टी.एच.डी. ते ४८.८२ मीटर टी.एच.डी. इतकी आहे. यामुळे तुलनेने उंच पातळी असलेल्या परिसरातील पावसाचे पाणी हे हिंदमाता परिसराच्या सखोल भागात जमा होते. जमा होणारे हे पाणी पर्जन्यजल वाहिनीद्वारे व गुरुत्वाकर्षण नियमानुसार उताराकडे नेले जाऊन ‘रे रोड’ परिसरातील ब्रिटानिया पातमुखाद्वारे समुद्रात सोडण्यात येते.

हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिनीचे मुख आणि त्यापासून सुमारे ७ किमी अंतरावर असणारे ब्रिटानिया पातमुख यांच्या पातळीतील फरक हा सुमारे २.५ मीटर एवढा आहे. शास्त्रीयदृष्ट्या हा फरक ‘अल्प’ असल्याने या पर्जन्यजल वाहिनीचा उतार देखील तुलनेने कमी आहे. परिणामी जमा झालेले पावसाचे पाणी संथगतीने प्रवाहीत होत असल्याने या परिसरातील पाण्याचा निचराही संथ गतीने होतो. यातून मार्ग काढण्यासाठी या परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. त्यामुळे पंपिंगला जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीला हिंदमाता येथील पाण्याची पातळी समांतर येईपर्यंत किमान दहा ते पंधरा मिनिटे एवढा वेळा पाणी साचले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी पर्जन्य जलवाहिन्यांचे काम काही अंशी पूर्ण झाल्याने पाणी साचण्याचा कालावधी हा सरासरी अर्धा तास एवढा होता. परंतु यंदा ही सर्व कामे पूर्ण झाल्याने दहा ते पंधरा मिनिटेच पाणी तुंबले जाईल आणि पावलाएवढेच पाणी याठिकाणी साचलेले पहायला मिळेल, असे महापालिकेच्या पर्जन्य जलविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणणे आहे.

- Advertisement -

यंदाच्या पहिल्या पावसाळ्यात किंग्ज सर्कल, गांधी मार्केट या परिसरात पाणी साचले. हिंदमाता पेक्षा येथील परिसर किंचित उंचीवर आहे. पण तिथे पाणी साचले पण हिंदमाता एक थेंबही पाणी तुंबले नाही. त्यामुळे यंदा हिंदमाताला तुंबणाऱ्या पाण्याचा तळ आता येथील नागरिकांना आणि प्रसारमाध्यमांना शोधावा लागेल, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -