घरमुंबईदादरमध्‍ये लवकरच २० बेडचे 'कोविड एचडीयू' रुग्‍णालय

दादरमध्‍ये लवकरच २० बेडचे ‘कोविड एचडीयू’ रुग्‍णालय

Subscribe

मुंबई महापालिका व हिंदुजा रुग्‍णालयाच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नातून दादरमध्‍ये लवकरच २० बेडचे ‘कोविड एचडीयू रुग्‍णालय'(हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट)सुरू करण्यात येणार आहे. कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (प.) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महापालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने अल्पावधीत २० रुग्‍णशय्या क्षमतेचे ‘कोविड एचडीयू’ (हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट) रुग्‍णालय उभारले आहे. सदर रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन हिंदुजा रुग्‍णालयाकडून केले जाणार आहे. तर या रुग्णालयासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजय देवगण यांच्‍या एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी महापालिकेला दिली आहे.

यामध्‍ये, अजय देवगण यांच्‍यासह बोनी कपूर, समीर नायर, रजनिश खानुजा, दीपक धर, तरुण राठी,अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ित आदींनी आर्थिक हातभार लावला आहे. सदर रुग्‍णालयासाठी संयंत्र, ऑक्सिजन पुरवठा, पाणी, वीज, सुरक्षा इत्‍यादी व्‍यवस्‍था महानगरपालिका पुरवणार आहे. तर हिंदुजा रुग्‍णालयाकडून वैद्यकीय तज्‍ज्ञ, परिचारिका, इतर मनुष्‍यबळ तसेच रुग्‍णांसाठी कपडे, अन्‍न, औषधी इत्‍यादी बाबी द‍िल्‍या जाणार आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्‍या सभागृह नेता वि‍शाखा राऊत व अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) संजीव जयस्‍वाल यांनी सदर रुग्‍णालयाच्या ठिकाणी भेट देऊन तेथील सेवासुविधेची पाहणी केली. तसेच, हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्‍याचे आदेश जयस्‍वाल यांनी द‍िले आहेत. दादर परिसरातील रुग्‍णांसाठी देखील अतिदक्षता उपचार सुविधा निर्माण करण्‍याचे आदेश अतिरिक्त आयुक्त जयस्‍वाल यांनी प्रशासनाला दिले होते. त्‍यानुसार जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर यांच्‍या प्रयत्‍नाने दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉल येथे रुग्‍णालय उभारण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली होती. आता काही दिवसातच हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपआयुक्‍त (परिमंडळ २) विजय बालमवार, जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर तसेच हिंदुजा रुग्‍णालयाचे वरिष्‍ठ जॉय चक्रवर्ती, जी/उत्‍तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्‍य) वीरेंद्र मोहिते हे उपस्थित होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -