घरमुंबईवेळेवर निकाल लावण्यात विद्यापीठ पुन्हा 'नापास'!

वेळेवर निकाल लावण्यात विद्यापीठ पुन्हा ‘नापास’!

Subscribe

मुंबई विद्यापीठाचा निकाल यंदाही वेळेवर लागण्याची शक्यता धुसर आहे. विद्यापीठीचे कुलगुरू बदलले असले तरीही त्याचा भोंगळ कारभार मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच ढिसाळ पद्धतीने सुरू आहे. पदवी परिक्षेचे विद्यार्थी वेळेवर निकाल लागण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

“तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे…” या अभंगाची ओवी मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरत आहे. सार्वजनिक विद्यपीठाच्या अधिनियमानुसार बोर्डाच्या परिक्षेतील शेवटचा पेपर संपल्यानंतर पुढील ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे अनिवार्य असते. मात्र, यंदाच्या वर्षीसुद्धा मुंबई विद्यापीठ वेळेवर निकाल जाहीर करण्यात अयशस्वी ठरलं आहे. मुंबई विद्यापीठातील बीए, बीकॉम आणि बीएससी या पदवी परिक्षांचा तिसऱ्या वर्षाचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

‘ढिसाळ कारभार’चं विद्यापिठाच्या अंगाशी

गेल्यावर्षीपासून विद्यापीठात पहिल्यांदाच ‘ऑनस्क्रीन मार्किंग’ सिस्टमची सुरुवात करण्यात आली होती. ‘मेरिट ट्रॅक’ या एजन्सीसोबत पुढील तीन वर्षांसाठी तब्बल तीन कोटींचा करार करण्यात आला होता. मात्र, ही कार्यप्रणाली विद्यापीठाच्या अंगाशी आली आहे. आधीच विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावण्यासाठी विद्यापीठाची तारांबळ उडत असताना नवीन कार्यप्रणालीमुळे त्यांच्या अडचणींमध्येही वाढ झाली आहे. पदवी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावणं अनिवार्य असतानाही गेल्या वर्षी मात्र हा निकाल ऑक्टोबर महिन्यातपर्यंत लागत होते. याबाबत विद्यार्थ्यांमध्येही संतापाची भावना होती. निकाल वेळेत लागावा आणि आपले वर्ष वाया जाऊ नये, यासाठी एका विद्यार्थ्याने विद्यापीठासमोर आंदोलनही केलं होतं. याप्रकरणी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

विद्यापीठाने आता तरी जागं व्हावं आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणं बंद करावं. प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात उशीर करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम तारीख चुकल्यावर अतिरिक्त शुल्क दंड म्हणून भरावा लागतो, तसंच विद्यापीठाकडूनही उशिरा निकाल लावण्याबाबत दंड आकारला पाहिजे. यामुळे मुंबई विद्यापीठ स्वत:च आपली प्रतिष्ठा घालवत आहे
– जास्वंदी मोरे, विद्यार्थी, भवन्स कॉलेज, मुंबई

“मुंबई विद्यापीठाने लवकरात लवकर निकाल जाहीर केले पाहिजेत. विद्यापीठ पुन्हा गेल्यावर्षीचाच कारभार चालवत असेल आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कुलगुरूंनी स्वतः विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणात अढथळा येणार नाही. “
– साईनाथ दुर्गे, युवासेना कार्यकारिणी सदस्य, मुंबई

विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर लावण्यात विद्यापीठ पुन्हा नापास झाले आहे. विद्यापीठाची सर्व यंत्रणे बदलूनही विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा हा प्रकार सुरूच आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र नक्कीच हाल होतील. महत्वाचं म्हणजे मुंबई विद्यापीठातून सर्वात जास्त विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी जातात. पंरतु, विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका त्यांना भोगावा लागणार आहे
– सचिन बनसोड, अध्यक्ष , छात्रभरती

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या पदरी मात्र ‘निराशा’

यंदाही तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा साधारण १२ एप्रिल २०१८ पासून सुरु झाल्या होत्या. दरम्यान, मुंबई विद्यापीठात कुलगुरू पदाचा पदभार रुईया महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हाती सोपवण्यात आला. महाविद्यालयीन कामकाजातील एका अनुभवी व्यक्तीकडे विद्यापीठाचा कारभार सोपवण्यात आल्यामुळे ‘यंदा तरी आपला निकाल वेळेत लागेल’, असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, यंदाही मुंबई विद्यापीठाने भोंगळ कारभाराची परंपरा जोपासत ४५ दिवस उलटूनही विद्यार्थ्यांचा निकाल लावलेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही विद्यार्थ्यांना याची झळ सोसावी लागणार आहे. यासंबंधी मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाले यांनी, ‘आतापर्यंत ८५% पेपरची तपासणी झाली असून येत्या काही दिवसात निकाल जाहीर करण्यात येतील’, असे सांगितले.

निकाल वेळेत लागणार – कुलगुरूंचे आश्वासन

अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले

एप्रिल – मे परीक्षा पेपरचे असेसमेंट जवळपास संपत आल्याने निकाल येत्या ३ ते ४ दिवसांत लागण्यास सुरूवात होईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच यंदाच्या निकालात कोणताही गोंधळ होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी निकालातील अदभूतपूर्व गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. यामुळे विद्यापीठाची पतही ढासळली होती. यावर्षीच्या एप्रिल – मे मधील परीक्षा वेळपत्रकातील गोंधळामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेत त्यांना विद्यापीठातील सर्व निकाल वेळेत लावण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -