नालासोपाऱ्यात भाजप आणि बहुजन विकास आघाडीत मोठा राडा झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विनोद तावडे यांना विवांत हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे.
आमच्या मतदारसंघात का आले? असा सवाल बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सत्तेचा गैरवापर चालू आहे, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.
नेमकं घडलं काय?
नालासोपाऱ्यातील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस थांबले होते. यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुनज विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर क्षितिज ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्याकडून एक बॅग हिसकावून घेतली आहे. त्या बॅगमध्ये दोन डायरी सापडल्या आहेत.
हेही वाचा : भाजपचा खेळ खल्लास! पैसे वाटपावरून राऊतांनी सुनावले
सरचिटणीसांना लाज, शरम काहीच नाही…
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले, “5 कोटी रूपयांचं वाटप सुरू आहे. अनेक डायऱ्या सापडल्या आहेत. राष्ट्रीय सरचिटणीसांना लाज, शरम काहीच नाही. 48 अगोदर मतदारसंघ सोडायचा नाही, हा साधा नियम तावडेंना माहिती नाही का? हे राज्याचे शिक्षणमंत्री होते.”
तावडेंवर कारवाई करावी…
“विनोद तावडेंनी मला 25 फोन केले, मला माफ करा.. मला जाऊद्या… मला माफ करा… पोलिसांनी आणि निवडणूक आयोगानं तावडेंवर कारवाई करावी. सगळ्यांना जाऊन देऊ. राष्ट्रीय नेता पैसे वाटपासाठी आले होते का? विनोद तावडे 5 कोटी रूपये घेऊन येणार, याची माहिती मला अगोदरच मिळाली होती. हे पैसे वाटप रात्रीपासून सुरू आहे,” असा आरोपही हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
हेही वाचा : विरारमध्ये भाजपा नेते विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप, ठाकूरांचा गंभीर आरोप