घरमुंबईगावितांना घ्यायला ‘बविआ’ धर्मशाळा नाही

गावितांना घ्यायला ‘बविआ’ धर्मशाळा नाही

Subscribe

गावितांना बहुजन विकास आघाडीत घ्यायला ती काही धर्मशाळा नव्हे, असा सणसणीत टोला आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लगावला. काँग्रेस-भाजप आणि आता शिवसेनेत प्रवेश करणार्‍या खासदार राजेंद्र गावित यांच्या पक्षबदलू भमिकेमुळे पालघर जिल्ह्यात खरपूस चर्चा होत आहेत.

त्यातच आता आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही आपली भूमिका मांडताना यंदाच्या लोकसभेसाठी उमेदवार पळवण्याचा प्रकार किळसवाणा आहे, अशी टीका केली. राजकारण्यांना लाज-शरम माहितीच नाही, अशी टीका सोशल मीडियावरून केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसमधून भाजप आणि आता शिवसेनेत प्रवेश केलेले राजेंद्र गावित पुढच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीत आले तर तुम्ही त्यांना घेणार का ? असा प्रश्न ठाकूर यांना विचारल्यावर बहुजन विकास आघाडी ही धर्मशाळा नाही. असे उत्तर देऊन गावित यांची ठाकूर यांनी खिल्ली उडवली.

- Advertisement -

केवळ सत्तेसाठी गावित पक्ष बदलत आहेत आणि आमचे पक्षश्रेष्ठीही भाजपातून आयात केलेल्यांना उमेदवारी देऊन शिवसेनेत लायक उमेदवार नसल्याचे दाखवून देत आहेत. शिवसेनेसाठी जागा सोडून आणि गावितांना शिवसेनेत पाठवून भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत, ही बाब साध्या शिवसैनिकांना कळते तर पक्षप्रमुखांना कळत नाही का? असा संतप्त सवालही शिवसैनिकांकडून केला जात आहे.

आज गावित कुठल्या पक्षात आहेत?
सोशल मीडियावरूनही गावित यांच्या या भूमिकेची खिल्ली उडवली जात आहे. पक्ष बुडाला तरी चालेल मात्र, आपली खुर्ची जाता कामा नये यासाठी गावित यांनी नीतीमत्ता गहाण ठेवली आहे. पालघर-वसईतील कार्यकर्ते दररोज फोन करून अपडेट घेताहेत की साहेब आज कोणत्या पक्षात आहेत. निवडणूक आयोगाने पालघर मतदानाची तारीख पुढे ढकलावी, कोण कुठल्या पक्षात आहे? हे समजण्यासाठी मतदारांना एक महिन्यांचा अवधी द्यावा, अशा वाक्यांनी गावित यांना ट्रोल केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -