सर्व पक्षांमध्ये माझे मित्र

१० जूनला पाठिंबा जाहीर करण्याची हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तीन आमदार एकत्रित बसून कुणाला सहकार्य करायचे, कुणाला मते द्यायची यावर चर्चा करू. त्यामुळे कुणी आमची मते गृहीत धरू नयेत, असा इशारा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. १० जूनपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा सर्वच पक्षांच्या आजी-माजी ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. उमेदवारांकडूनही या न त्या माध्यमातून माझ्याशी संपर्क झालेला आहे. प्रत्येक निवडणुकीत ते होत असते. सर्वच पक्षांत माझे मित्र आहेत. सर्वच पक्षांना मी जवळचा वाटतो. मला कोणत्याही पक्षाची अ‍ॅलर्जी नाही. लोकांची आमच्याकडून अपेक्षा असते. आम्ही काय कामे केली हे ते पाहत असतात. त्यामुळे राज्य सरकार असो की केंद्र सरकार, आम्हाला आमच्या कामात कोण सहकार्य करेल किंवा करणार आहे हे पाहून आम्ही आमचे मत देऊ, असे ठाकूर यांनी सांगितले.

दिल्लीतील नेतृत्व या निवडणुकीत सक्रिय सहभाग दाखवेल असे मला वाटत नाही. अन्य कुणाला त्यांच्याकडून संपर्क झाला असेल तर त्याबद्दल मला कल्पना नाही.

माझ्यावर ईडी वगैरे कुणाचा दबाव नाही. कुणावर तसा दबाव असेल तर मला माहीत नाही, पण माझ्यावर तरी अद्याप तसा दबाव नाही. भविष्यातही असे कुणी उपद्व्याप करणार नाही याची मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा दबावांना घाबरणारे आम्ही नाहीत. आयुष्यात खूप चढउतार पाहिलेत. उन्हाळे-पावसाळे पाहिलेत. कार्यकर्ते भक्कमपणे आमच्याबरोबर उभे राहिलेत. वाईट दिवसांतही त्यांनी आम्हाला साथ दिली. एक कुटुंब म्हणून सोबत केली आहे. त्यामुळे अशा काही गोष्टींना मी घाबरत नाही आणि भीकही घालत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जो काही निधी लागेल, जी काही कामे लागतील, ती जो पक्ष करेल, त्याला आपण साथ द्यायची. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल असे सुरुवातीला वाटले होते, पण लोकशाही आहे. समीकरणे बदलत राहतात. त्यामुळे भविष्यात विधान परिषदेची निवडणूक कशी होईल हे आताच सांगता येणार नाही. कोण किती उमेदवार उभे करते त्यावर सर्व काही अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.