कोणीही येणार आणि भोंगे काढायला सांगणार, वळसे पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही घटना घडत आहेत. पण राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे. पोलिसांकडून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली जात आहे. मात्र, भाजपसह अनेक घटकांकडून राज्यात जाणूनबुजून अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावरून राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. कोणीही येणार आणि भोंगे काढायला सांगणार, कोणीही धमकी द्यायची आणि सरकारने ते सहन करायचे, राज्यात हुकुमशाही आहे का?  हे चालणार नाही, असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही घटना घडत आहेत. पण राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे. पोलिसांकडून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली जात आहे. मात्र, भाजपसह अनेक घटकांकडून राज्यात जाणूनबुजून अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था अडचणीत आली आहे, असे मानण्याचे कारण नाही, असे वळसे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

भोंग्यावरून सरकारला अल्टिमेटम, धमकी द्यायची आणि उद्या पोलिसांनी कारवाई केली तर पोलीस आणि सरकारला दोष द्यायचा. हे बरोबर नाही, असेही ते म्हणाले. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की,  राजद्रोहाचा गुन्हा का लावला ते न्यायालयात पटवून देऊ. राजद्रोहाचे कलमच राहिले नाही तर त्याचा गैरवापर होणार नाही. त्यामुळे राजद्रोहाच्या कलमावर केंद्रानेच डेडलाईन ठरवणे गरजेचे आहे. सरकारला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही वळसे पाटील यांनी व्यक्त केला.