Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम हनिमून पॅकेजच्या नावाखाली मुंबईकर नवविवाहित दाम्पत्याची फसवणूक; झाली १० वर्षांची कैद!

हनिमून पॅकेजच्या नावाखाली मुंबईकर नवविवाहित दाम्पत्याची फसवणूक; झाली १० वर्षांची कैद!

Related Story

- Advertisement -

लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य बऱ्याचवेळा पॅकेजची निवड करतात. त्यामुळे अशी पॅकेजेस देणाऱ्या कंपन्यांची चांगलीच चांदी होत असते. पण अशा हनिमून पॅकेजच्या माध्यमातून आपलीच चांदी करून घेण्यासाठी नवविवाहित दाम्पत्याला चुना लावणाऱ्या आंटीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही नवरदेवाची सख्खी काकी असून तिच्यामुळे हनिमूनला गेलेलं हे नवविहाहित जोडपं कतारच्या तुरुंगात १० वर्षांच्या तुरुंगवासासाठी पाठवलं गेलं आहे. या तुरुंगात दाम्पत्यानं जवळपास २ वर्षांचा कालावधी पूर्ण देखील केला असून तिथेच त्यांनी एका मुलीला जन्म देखील दिला आहे. दाम्पत्याच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. आता या दोघांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. झी न्यूजनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मुंबईत राहणारी ओनिबा कुरेशी…

आणि शरीक कुरेशी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर शरीक कुरेशी याच्या सख्ख्या काकीनं त्यांना कतारमध्ये हनिमून पॅकेजचं गिफ्ट दिलं. शरीक नाही म्हणत असताना देखील कुटुंबीयांच्या दबावामुळे त्याला पॅकेज घ्यावं लागलं. यासाठी शरीक आणि ओनिबा बंगळुरूला गेले. तिथे एका हॉटेलमध्ये त्याच्या काकीनं हनिमून पॅकेजची सगळी कागदपत्र आणि एक बॅग सोपवली. ती बॅग कतारमध्ये एका परिचिताला देण्यासंदर्भात सांगितलं. शरीकनं वारंवार बॅगेत काही अवैध सामान तर नाही ना? अशी विचारणा केली. मात्र, काकीनं साधं सामान असल्याचं सांगितलं.

दरम्यान, शरीक आणि ओनिबा…

- Advertisement -

कतार विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. तपासणीमध्ये काकीनं दिलेल्या बॅगेत तब्बल ४ किलोहून जास्त ड्रग्ज सापडलं. शरीकनं ते सामान काकीचं आहे असं वारंवार सांगून देखील पोलिसांनी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला आणि त्या दोघांनाही अटक करण्यात आली.

पुरेसे पुरावे नसल्यामुळे…

शरीक आणि ओनिबा यांना कतारमध्ये न्यायालयाने १० वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली. इकडे मुंबईत कुटुंबीयांनी या काकीला विचारणा केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. तसेच, आपण ड्रग्ज सिंडिकेटचा हिस्सा असल्याचं देखील सांगितलं. मात्र, त्यांना मदत करण्याला नकार दिला. अखेर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. पण काकीशी संबंधित एका ड्रग्ज पेडलरला अटक करून पोलिसांनी तपास थांबवला. शेवटी कुटुंबीयांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाची अर्थात NCB ची मदत घेतली. आता एनसीबीच्या मदतीने या दोघांना परत भारतात मुंबईला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -