घरमुंबईपालिका साहित्य चाचणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

पालिका साहित्य चाचणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

Subscribe
मुंबई : मुंबई महानगरमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत होणारी बांधकामे, रस्ते, पूल आदींसाठी वापरात येणाऱ्या साहित्यांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई महापालिकेच्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेचे योगदान महत्वाचे आहे. या प्रयोगशाळेला राष्ट्रीय चाचणी व अंशशोधन प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळ यांच्याद्वारे मान्यता मिळाली आहे. हे राष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी योगदान दिलेल्या अधिकारी व अभियंते यांचा सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार यांच्या हस्ते प्रशस्‍तिपत्र प्रदान करून आज (17 मे) सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार विविध अधिकारी, अभियंते यांनी प्रयत्न केले आहे. या चमूतील उपप्रमुख अभियंता रामचंद्र कदम, कार्यकारी अभियंता शंकर भोसले, सहायक अभियंता महेंद्र सपकाळ, दुय्यम अभियंता जितेंद्र राठोड, दुय्यम अभियंता अशोक कर्पे, दुय्यम अभियंता सुनील पाटकर, दुय्यम अभियंता रमेश बनकर, दुय्यम अभियंता वैभव घरत, दुय्यम अभियंता राहुल बाटे, लिपीक विजय चावडा, लिपीक अंबादास मिसाळ आदींना प्रशस्‍तिपत्र प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व नागरी प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध सामग्रीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेची स्वतःची प्रयोगशाळा आहे. कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध साहित्याची चाचणी या प्रयोगशाळेत केली जाते. या प्रयोगशाळेला राष्ट्रीय चाचणी व अंशशोधन प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळ यांच्याकडून राष्ट्रीय मानांकन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून अर्ज करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रीय चाचणी व अंशशोधन प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळाने महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेची तपासणी केल्यानंतर 26 जुलै 2022 रोजी प्रयोगशाळेला मान्यता मिळाली.
मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागाने साहित्य चाचणी प्रयोगशाळेत विश्वासार्ह कार्य केले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘एनएबीएल’कडून राष्ट्रीय मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. साहित्य चाचणी प्रयोगशाळेला अशा प्रकारची राष्ट्रीय मान्यता मिळालेली मुंबई महापालिका ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, असे सदर चमूचा सन्मान केल्यानंतर सह आयुक्त (दक्षता) अजित कुंभार यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे मानांकन महापालिकेला राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारे ठरले आहे. मुंबई महानगरात होणारी बांधकामे, रस्ते, पूल आदींच्या साहित्याची गुणवत्ता तपासणी करताना प्रयोगशाळेला आता अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. प्रयोगशाळेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांनी दक्ष रहावे, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिका मुख्यालयात सहआयुक्त (दक्षता) दालनात छोटेखानी कार्यक्रम पार पडला. सहआयुक्त अजित कुंभार यांच्यासह संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) अतुल पाटील, उपायुक्‍त (अभियांत्रिकी) विनोद चिठोरे, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, प्रमुख अभियंता (दक्षता) गिरीश निकम आदी  उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -