घरमुंबईठाण्यातील होरायझन प्राईम रुग्णालयाची मान्यता रद्द

ठाण्यातील होरायझन प्राईम रुग्णालयाची मान्यता रद्द

Subscribe

 ठाण्यातील कोविड 19 रुग्णालय म्हणून मान्यता मिळालेल्या ‘होरायझन प्राईम’ या खाजगी रुग्णालयाची कोविड 19 रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. शिक्षा म्हणून या रुग्णालयाची नियमित नोंदणी देखील एक महिन्यासाठी रद्द केली गेली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून भरमसाठ बिले आकारल्याप्रकरणी मान्यता रद्द करण्याचा आदेश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शनिवारी जारी केला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेच्या या कारवाईमुळे कोरोना रुग्णाकडून भरमसाठ बिले आकारणार्‍या खाजगी रुग्णालयाचे धाबे दणाणले आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथील होरायझन प्राईम या खाजगी रुग्णालयाला कोविड 19 रुग्णावर उपचार करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 2 एप्रिल 2020 रोजी कोविड 19 रुग्णालय म्हणून मान्यता दिली होती. ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर होरायझन प्राईम या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, या रुग्णालयांकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून भरमसाठ बिले आकारण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी ठाणे महानगरपालिकेकडे दाखल झालेल्या होत्या. यापैकी 56 रुग्णाच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली होती.

- Advertisement -

याप्रकरणी महानगरपालिकेने या रुग्णालयाला 20 जुलै नोटीस बजावून दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा करावा, असे सूचित केले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून कुठलाही लेखी खुलासा न आल्यामुळे अखेर शनिवारी या रुग्णालयाची कोविड 19 रुग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून शिक्षा म्हणून या रुग्णालयाची नियमित नोंदणी देखील एक महिन्यासाठी रद्द केली असल्याचा आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जारी केले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी पत्रकारांना दिली.

या रुग्णालयाकडून भरमसाठ बिले आकारणे, बेडचे गैरव्यवहार केल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे आलेल्या होत्या. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वॉररूममध्ये बेडसंदर्भात होरायझन प्राईम रुग्णालयाकडून कुठलाही समन्वय झाला नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी म्हटले आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत आणि सरकारी दराप्रमाणे शुल्क आकारले जाईल, याची काळजी घेण्यासाठी ऑडिट विभागातून डॉ. प्रेसिता क्षीरसागर आणि बाळासाहेब करंडे यांची नेमणूकही करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण रुग्णालयात सतत सॅनिटायजेशन करणे, रुग्णालयांचा परिसर आणि रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे शुल्क आणि सेवा शुल्क बिलात वाढ झाली असल्याचा दावा या रुग्णालयांकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -