बिल्डर कडून घेतलेली घरे क्षणार्धात उद्ध्वस्त, संसार उघड्यावर

घर घेतांना सावधगिरी बाळगा, कागदपत्रांची शहानिशा करा अन्यथा फसवले जाल

नाशिक : सातपूर चुंचाळे येथील केवल पार्क भागात इमारतीससाठी राखीव असलेल्या जागेत बांधलेल्या घरांवर महापालिकेने बुधवारी अतिक्रमित घरे पाडण्याची धडक मोहीम राबविली. मात्र, या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून अतिक्रमण पाडण्याची तक्रार करणार्‍या बिल्डरनेे ही घरे बनवून तीन लाख रुपयांत विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संजय सायंकर असे या बिल्डरचे नाव असून विक्री केलेल्या घरांसंबंधितचे कुठलेही कागदपत्र न देता पैसे घेतल्याचा आरोप पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रवीण सिद्धार्थ अहिरे यांच्यासह १३ सदनिकाधारकांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यात संजय सायंंकर (रा.भाग्यसंकेत, लवाटे नगर, सिटी सेंटर मॉलजवळ) यांनी चिंचोली शिवारातील सिद्धिविनायक कॉलनी येथील सर्वे नंबर ३१/१ ब या मिळकतीवर दहा बाय पंधरा फुटाची एकूण १४ घरे बांधली. ही घरे हायटेन्शन विद्युत वाहिनीच्या लगत बांधली आहेत. संबंधित जमीन आपलीच असल्याचे भासवून मोलमजुरी करणार्‍या कामगारांना विश्वासात घेत घरांची विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जमिनीबाबत भविष्यात वाद उपस्थित झाल्यास आपण त्याचे निराकरण करून देऊ, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. सायंकर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्थानिक कामगारांनी तीन लाख रुपये किमतीनुसार घरे विकत घेतली. व्यवहार करताना कुठल्याही स्वरूपाची कागदपत्रे, करारनामा करण्यात आला नाही. पैसे दिल्याच्या पावत्या त्यांना देण्यात आल्या नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. ८ फेब्रुवारी 2019 रोजी सायंकर यांनी घराचा ताबा दिला.

याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार दाखल झाल्यानंतर येथील सदनिकाधारक प्रवीण सिद्धार्थ आहिरे यांच्यासह १३ जणांना महापालिकेने घरे अनधिकृत असल्याबाबत नोटीस बजावली. यानंतर सदनिकाधारकांनी सायंकर यांच्याशी संपर्क साधला असता महापालिकेतील अधिकारी ओळखीचे असून काय आहे ते बघून घेऊ, असे सांगून नागरिकांची समजूत काढली. मात्र, १८ तारखेला अकरा वाजेच्या दरम्यान महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून सर्व घरे जमीनदोस्त केली.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई केल्याने नागरिक हवालदिल झाले. नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू अतिक्रमण विभागाने रस्त्यावर फेकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे वृद्ध आणि बालकांचे अतोनात हाल झाले असून रात्र रस्त्यावर काढावी लागली आहे. सायंकर यांनीच अतिक्रमण विभागाला सांगून घरे पाडले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. याबाबत पीडित नागरिकांनी बिल्डर सायंकार यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी तुम्हाला ओळखतच नाही’ अशीच भूमिका सायंकर यांनी घेतल्याने दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला गेलाय. पीडितांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत सायंकर याच्याविरुद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.