ती बाटली आली कुठून, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला पूर्ण किस्सा

Jitendra awhad eat shiv bhojan thali
शिव भोजनाचा आस्वाद घेताना गृहमंत्री जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी शिव भोजन थाळीचा आस्वाद घेतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आव्हाड यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी यावर खुलासा केला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सदर फोटो ट्विट केल्यानंतर त्यावर अनेक माध्यमांनी बातम्या देखील केल्या होत्या. आज ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये आपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीच्या प्रकाशनावेळी बोलत असताना आव्हाड यांनी त्या फोटोमागची खरी कहाणी सांगितली.

“मी २६ जानेवारी रोजी शिव भोजन थाळी केंद्राचे उदघाटन केले. काही लोकांनी पाण्याची बाटली दाखवली. पण ती बाटली मी विकत घेतलेली नव्हती. हॉटेलचे चालक बिसलरीच्या मोकळ्या बॉटल्स पुर्नवापरासाठी हॉटेलमध्ये वापरतात. मला देखील जुन्या बाटलीत पाणी भरून देण्यात आले होते. पण मनसेच्या खोपकरांनी हा बिसलरी असलेला फोटो टाकला आणि घटना ट्रोल झाली. ट्रोल नावाची नवीन आर्मी झाली आहे. पण एकंदरीतच सामाजिक व्यवस्थेला ही चांगली गोष्ट नाही.”, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.

आव्हाड पुढे म्हणाले की, “आज ज्या पद्धतीच्या शिव्या, मिम्स बनवले जात आहेत. असे विकृत प्रदर्शन यापूर्वी कधीच झाले नाही. एखादा फर्डा वक्ता बोलत जातो, तेव्हा शब्द कुठून येतात हे कळत नाही. पण आता हा कॅमेरारूपी राक्षस समोर उभा राहिला की अडचण होते. म्हणून अनेक वक्ते आपले शब्द जपून वापरतात. कारण एकदा बोललेल रेकॉर्ड झाल की दुसऱ्यादिवशी वाद नको.”

“तंत्रज्ञानाचा वापर समाज सुधारणेसाठी करायचा की समाजामध्ये मानसिक विकृती आणण्यासाठी? याचा विचार आजच्या तरूणांनी करणे फार गरजेच आहे. वृत्तपत्रे एक पिढी घडवत असतात. बातम्या एक पिढी घडवत असतात, असे सांगत आव्हाड यांनी आपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीला शुभेच्छा दिल्या.

आमचं लग्न पाच वर्षे मोडणार नाही

सत्ता स्थापनेसाठी अजूनही शिवसेनेला प्रस्ताव देणाऱ्या भाजपवरही आव्हाड यांनी यावेळी टीका केली. “लग्न मंडपात नवरा बाशिंग बांधून तयारच आहे, अशी उत्सुकता काही जणांकडे दिसत आहे. पाच वर्षे आमचे लग्न मोडणार नाही. तुमच बाशिंग आहे, तसेच पाच वर्षे राहू द्या. इतका उतावळापणा का आहे? तुमची सत्ता येते की जाते? हे लोकशाहीमध्ये लोक ठरवतात.”