दगळी चाळीत दररोज नव्या खोलीत झोपणारा डॅडी, अखेर पोलिसांना सापडला सोफ्यात

arun gawli dagdi chawl

मुंबईतील गॅंगवॉर आणि पोलिसांच्या सोबतच्या चकमकी, अटकेसाठीचे सापळे आणि एन्काऊंटरची टांगती तलवार या सगळ्यातून बचावासाठी अरूण गवळीने मुंबईत सेफ झोन तयार केला तो दगडी चाळीच्या निमित्ताने. पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेकदा पळ काळण्यासाठी या चाळीचेच आश्रय अरूण गवळीला अनेक वर्षे महत्वाचे ठरले. अरूण गवळीने १९८०-९० च्या दशकात मोठ्या केलेल्या गॅंगचे गुंड गुन्ह्यानंतर आश्रयासाठी याच दगडी चाळीचा आश्रय घ्यायचे. आश्रयासाठी हा सर्वात सेफ झोन होता. त्याचे कारण होते ते म्हणजे पोलिसांच्या धाडीची आगाऊ मिळणारी माहिती. त्यामुळेच पोलिसांच्या सापळ्यातून खुद्द अरूण गवळी डॅडीही सुटायचा. याच दगडी चाळीने अरूण गवळीला पोलिसांच्या अटकेतून अनेकदा आश्रय दिला. दगडी चाळीच्या याच दबदब्याच्या नावलौकिकामुळे या चाळीला वेगळे महत्व मिळाले होते. महत्वाचे म्हणजे पोलिसांमध्येही डॅडीसाठी काम करणारे खबरी होते. जे पोलिसांची रेड कधी पडणार आहे यासारखी नेमकी माहिती पुरवायचे. तसेच दगडी चाळीतील अनेक लोक अरूण गवळीच्या मदतीलाही यायचे. याच जनाधारावरच अरूण गवळी अनेकदा पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्यासाठी यशस्वी ठरला होता. पण जुलै १९८९ मध्ये पोलिसांनी अतिशय गुप्त ठेवलेल्या माहितीमुळेच तडीपार असलेल्या अरूण गवळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. एकेकाळी हीच डॅडीची आश्रयाची जागा असलेली दगडी चाळ आता पुर्नविकासाच्या मार्गावर आहे. दगडी चाळीच्या ठिकाणी दोन टोलेजंग टॉवर्स लवकरच उभे राहणार आहेत.

सोफ्यात सापडला डॅडी

अनेक गुन्ह्यांनंतर पोलिसांना चकमा देणारा डॅडी अनेकदा दगडी चाळीत आश्रयाला यायचा. त्यादिवशीही अरूण गवळीची टीप पोलिसांना मिळाली होती. अरूण गवळी त्यादिवशी लाल गाडीत दगडी चाळीत आश्रयाला आला होता. डॅडी कधीच एका घरात झोपायचा नाही. दररोज रात्री तो आपली झोपायची ठिकाण बदलायचा. ज्या घरामध्ये डॅडी झोपणार असेल त्या घरातील सदस्यांची इतर ठिकाणी व्यवस्था व्हायची. पोलिसांची धाड पडली किंवा रातोरात हल्ला झाला तर आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून डॅडीची ही मोडस ऑपरेंडी होती. पण जुलै १९८९ ला डॅडी पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागला. पोलिस आयपीएस अधिकारी अरविंद इनामदार यांना डॅडी दगडी चाळीत आल्याची पक्की टीप होती. त्यांनी दगडी चाळीत धाड टाकायला सुरेश वालीशेट्टीसह टीम पाठवली. त्यादिवशी दगडी चाळीत टाकण्यात आलेल्या धाडीत पोलिसांना ६ वॉटेंड गुंड सापडले खरे, पण ज्या डॅडीच्या शोधात मुंबई पोलिसांना धाड टाकली होती, तो डॅडी मात्र काही सापडला नाही. सुरेश वालीशेट्टी या पोलिस निरीक्षकाने डॅडीची लाल गाडी चाळीच्या परिसरात असल्याचे पाहिले होते. त्यामुळे डॅडी चाळीतच आहे हा विश्वास त्यांना होता. त्यामुळेच दगडी चाळीतील घर ना घर शोधून काढण्याची मोहीम सुरू झाली. प्रत्येक घराघरात पोलिसांनी डॅडीला शोधायला सुरूवात केली. अनेक घरांमध्ये शोधाशोध होत होती, पण डॅडीचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर डॅडी एका घरातील सोफ्याच्या आत झोपलेला आढळला. त्याच ठिकाणी पोलिसांनी डॅडीच्या मुसक्या आवळल्या.

किचन ओट्याखाली होता भुयाराचा मार्ग

अंडरवर्ल्ड गॅंग चालवताना दगडी चाळ हेच डॅडीचे सत्ताकेंद्र बनले होते, याठिकाणाहूनच मुंबईतील ही गॅंग चालायची. दगडी चाळीत एक तळ घर होते. तर एक तपास रूम आणि सेटलमेंट रूमही होती. इतर गॅंगच्या गुंडांना बोलावून त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करून शत्रूच्या गॅंगची माहिती डॅडी घ्यायचा. अनेकदा सेटलमेंट रूममध्ये बिल्डर आणि व्यापारी यांच्यासोबत खंडणी वसुलीचेही प्रकार व्हायचे. तर तळ घराचा वापर हा डॅडीने लपण्यासाठी केला होता. तळ मजल्याच्या काही घरातून डॅडीने एक भुयारी मार्गाची निर्मिती केली होती. एरव्ही सर्वसाधारण घरात किचनमध्ये जिथे सिलेंडर ठेवण्यात येतो, त्याठिकाणी तळ घरात जाणारा भुयारी मार्गाचा रस्ता तयार केला होता. याच तळघरात डॅडी पोलिसांची नजर चुकवत सेफ पद्धतीने रहायचा.