Homeक्राइमTorres Scam : टोरेस कंपनीचे मालक विदेशात फरार; गुंतवणूकदाराने सांगितलं घोटाळ्यात कसे...

Torres Scam : टोरेस कंपनीचे मालक विदेशात फरार; गुंतवणूकदाराने सांगितलं घोटाळ्यात कसे अडकलो

Subscribe

टोरेस कंपनीत अचानक कोट्यावधीची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने लोकांना कसे फसवले? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. याप्रकरणी आता एका गुंतवणूकदाराने माहिती दिली आहे.

मुंबई : गुंतवणुकीवर दर आठवड्याला 10 टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सोमवारी (6 जानेवारी) शेकडो गुंतवणूकदारांनी मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मीरा-भाईंदर कार्यालयाबाहेर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अचानक कोट्यावधीची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने लोकांना कसे फसवले? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. याप्रकरणी आता एका गुंतवणूकदाराने माहिती दिली आहे. (How the Torres company forced citizens to invest)

टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीच्या मुंबईसह इतर शहरातही शाखा आहेत. कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केलयावर त्यावर गुंतवणूक केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर विविध आकर्षक योजना सुरू करून अनेकांना या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला अनेकांना व्याजदराची रक्कम देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांनी इतरांनाही गुंतवणुकीस प्रवृत्त केल्यास मोठ्या रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाने कंपनीत गुंतवणूकदारांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले. हा प्रकार संशयास्पद वाटताच अनेक गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखेत गर्दी केली.

हेही वाचा – Torres Scam : कल्याणमधील महिलेला पश्चाताप; पतीनं मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे टोरेसमध्ये गुंतवले

कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकारी पळून गेल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. त्यानंतर दादरच्या शाखेबाहेर अनेक गुंतवणूकदारांनी मोर्चा काढून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आश्‍वासन दिले. त्यानंतर प्रदीपकुमार मामराज वैश्य या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार यांना अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी स्थानिक न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण या सगळ्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार असणारे कंपनीचे दोन संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सांगितले की, मुंबई महानगर हद्दीत टोरेस कंपनीचे एकूण सहा आलिशान शोरूम होते. यात दादर, ग्रँट रोड, कांदिवली, मीरा रोड, कल्याण आणि सानपाड्यातील शोरूमचा समावेश आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये सर्व शोरीम सुरू करण्यात आले होते. गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेस कंपनीने सुरुवातीला संपूर्ण शहरात मोठे सेमिनार्स घेतले. त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्यांचं आमिष दाखवून आकर्षित करण्यात आले होते. याप्रकरणी गुंतवणूकदाराने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

हेही वाचा – Dadar Railway Station : तरुणीचे केस का कापले? आरोपीने सांगितले अजब कारण

कंपनीने गुंतवणूकदारांना कसे फसवले?

दरम्यान, टोरेस कंपनीतील गुंतवणूकदार गीता गुप्ता यांनी सांगितले की, कंपनीनं आम्हाला चार प्रकारच्या योजना सांगितल्या होत्या. पहिल्या योजनेत दर आठवड्याला 2 टक्के व्याज परताव्यासह सोन्यात गुंतवणूक, दुसऱ्या योजनेत 3 टक्के व्याज परताव्यासह चांदीमध्ये गुंतवणूक, तिसऱ्या योजनेत 4टक्के व्याज परताव्यासह मेझेनाईट स्टोनमध्ये गुंतवणूक आणि चौथ्या योजनेत मोझेनाईट खड्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 5 ते 6 टक्के व्याजदर परतावा मिळेल, अशी माहिती आम्हाला देण्यात आली होती. गुंतवणूक केल्यानंतर टोरेस कंपनीने हळूहळू गुंतवणुकीवरील व्याजदर परतावा वाढवायला सुरुवात केली होती. त्यामुळे अधिकाधिक लोक कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू लागले. कंपनीने पैशांच्या स्वरूपात गुंतवणूक करण्यास लोकांना प्रोत्साहन केले. तसेच त्यातून आठवड्याला 11 टक्के व्याजदर परताव्याचे आश्वासन देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे जर कुठल्याही गुंतवणूकदाराने नवीन गुंतवणूकदार कंपनीकडे आणला, तर त्या व्यक्तीला 20 टक्के व्याजदर परतावा मिळेल, असेही कंपनीने सांगितले होते. त्यामुळे मी सुद्धा गुंतवणूक केली, मात्र आता माझे 15 लाखाचे नुकसान झाले आहे, असे दु:ख गीता गुप्ता यांनी बोलून दाखवले.