Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई बारावीच्या निकालाला होणार विलंब; सर्व्हर डाऊनचा बसणार फटका

बारावीच्या निकालाला होणार विलंब; सर्व्हर डाऊनचा बसणार फटका

राज्य मंडळाची संगणकीय प्रणाली मंगळवारपासून धीम्या गतीने सुरू असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात अडचणी येत आहेत. माहिती भरण्यास होत असलेल्या विलंबामुळे शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून मुदतवाढीची मागणी होत आहे.

Related Story

- Advertisement -

दहावीच्या निकालावेळी राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला लागलेल्या ग्रहणाचा फटका बारावीच्या निकालालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य मंडळाची संगणकीय प्रणाली मंगळवारपासून धीम्या गतीने सुरू असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात अडचणी येत आहेत. माहिती भरण्यास होत असलेल्या विलंबामुळे शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून मुदतवाढीची मागणी होत आहे.

दहावीच्या निकालापाठोपाठ बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. मात्र दहावीच्या निकालावेळी राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला लागलेले ग्रहण अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारपासून राज्य मंडळाने अकरावी प्रवेशासाठी सीईटीसाठी स्वतंत्र लिंक जाहीर केली, मात्र पहिल्याच दिवसापासून तिला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अपडेटचे काम करत असलेल्या शिक्षकांनाही या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात बारावीला सुमारे १३ लाख विद्यार्थी असून, त्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचे गुण अपडेट करायचे आहेत तर मुंबईत तीन लाख विद्यार्थी असून, एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे गुण अपडेट करायचे आहेत. तसेच राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणांची अंतिम पडताळणी करायची असून, मुंबईतील एक लाख विद्यार्थ्यांचे गुण अद्याप अंतिम झालेले नाहीत.

- Advertisement -

गुण वेळेत भरले जावे यासाठी रेल्वे प्रवासाची मुभा नसतानाही आणि सलग होत असलेल्या पावसामुळे तासन्तास प्रवास करून शिक्षक शाळेमध्ये निकालाच्या कामासाठी येत आहेत. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सर्व्हर डाऊन असल्याने त्यांना बसून राहावे लागत आहे. याबाबत शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य मंडळाकडे तक्रारी केल्यानंतर संगणक प्रणाली सुरू झाली असली तरी ती धीम्या गतीने चालत असल्याने गुण भरण्यामध्ये शिक्षकांना अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊनमुळे अडचणी येत असतानाही राज्य मंडळाने अंतिम गुण भरण्यासाठी दिलेली २३ जुलै तारीख कायम ठेवण्यात आली आहे. सलग सर्व्हर डाऊन असल्यास गुण भरण्यासाठी मुदतवाढीची गरज असल्याचे मत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -