शाहरुख खानच्या मन्नत नजीकच्या इमारतीत भीषण आग, गच्चीवर रहिवासी सुखरूप

 स्थनिक पोलीस, पालिका वार्ड कार्यालय अधिकारी, अग्निशमन दल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र अवघ्या अर्ध्या तासात आग भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने रात्री ८.०५ वाजताच्या सुमारास आग स्तर -२ ची असल्याचे जाहीर केले.

विलेपार्ले येथे एलआयसी ऑफिसला व त्यानंतर रविवारी धारावी येथे आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच लागोपाठ तिसऱ्या दिवशी मुंबईत आग लागली. वांद्रे येथील अभिनेता शाहरुख खान यांच्या ‘मन्नत’ या बंगल्यानजीकच्या एका बहुमजली इमारतीत सोमवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भीतीने थरकाप उडल्याने रहिवाशांची धावपळ झाली. या इमारतीच्या गच्चीवर अडकून पडलेल्या रहिवाशांना आग विझविल्यानंतर इमारतीबाहेर काढण्यात येणार आहे.

या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. सदर आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, वांद्रे (पश्चिम), बँडस्टॅण्ड रोड, ‘मन्नत’ बंगल्यानजीक असलेल्या तळमजला अधिक २१ मजली ‘जिवेश’ या टॉवरमधील १४ व्या मजल्यावर सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.  आगीची माहिती मिळताच सदर टॉवर व परिसरात खळबळ उडाली. काही भयभीत रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. तर काही रहिवाशी जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले.

स्थनिक पोलीस, पालिका वार्ड कार्यालय अधिकारी, अग्निशमन दल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र अवघ्या अर्ध्या तासात आग भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने रात्री ८.०५ वाजताच्या सुमारास आग स्तर -२ ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन व ७ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत कोणीही जखमी झालेले नसल्याचे समजते. मात्र ही आग का व कशी लागली याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे.