वांद्रे स्टेशनबाहेर शेकडोंनी परप्रांतीय मजुरांची गर्दी; घरी जाऊ देण्याची मागणी!

देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये शेकडोंच्या संख्येने लोक जमा झाले आहेत. वांद्रे स्टेशनबाहेर ही सर्व लोकं जमा झाली. वांद्र्याच्या पश्चिमेकडच्या बाजूला जामा मशिदीच्या समोरच्या भागामध्ये मोठ्या संख्येने लोकं जमा झाली . एकाच ठिकाणी ही सर्व लोकं जमा झाली असून त्यांना हटवण्याचा आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी तातडीने सुरू केला. लॉकडाऊनमुळे गेल्या २१ दिवसांपासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे कुणालाही घराबाहेर पडता आलेलं नाही. त्यामुळे गावोगावचे मजूर या ठिकाणी अडकले आहेत. आसपासच्या कारखाने आणि कंपन्यांमध्ये हे कामगार काम करतात. यातले बहुतांश मजूर हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या भागातले होते. या कामगारांना इथे स्वत:चं असं घर नाही. त्यामुळे आता राहायचं कुठे? असा प्रश्न या मजुरांनी विचारला. काही वेळाने या जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं.

लॉकडाऊन वाढल्यामुळे कामगारांचा संयम सुटला | Workers angry because of the lockdown

लॉकडाऊन वाढल्यामुळे कामगारांचा संयम सुटला | Workers angry because of the lockdown

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 14, 2020

या सर्व लोकांना आशा होती की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या सीमा खुल्या करून अडकलेल्या लोकांना घरी जाण्याची परवानगी देतील. मात्र, केंद्र सरकारच्या लॉकडाऊ वाढवण्याच्या निर्णयामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आणि ते एकत्र आले. पण आता आम्ही त्यांची समजूत काढली आहे आणि ते परतले आहेत. त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय राज्य सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन आम्ही त्यांना दिलं आहे.

अनिल देशमुख, गृहमंत्री

पोलिसांची मोठी कुमक तातडीने घटनास्थळी हजर झाली

दरम्यान, या प्रकारावरून राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सध्या घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, गुजरातच्या सुरतमध्ये देखील झालेल्या गोंधळाला केंद्र सरकारचं धोरणच कारणीभूत आहे. अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी जाण्याची सोय न केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी ट्वीट करून केली आहे.

आठवड्याभरापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे इथे मागण्या केल्या होत्या. तेव्हाच जर राज्य सरकारने पावलं उचलली असती, तर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या. आता तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली आहे. आम्ही आमच्या स्तरावर या मजुरांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारने त्यांना अन्नधान्य घरपोच पोहोचवण्याची सोय करावी.

आशिष शेलार, आमदार, भाजप

साधारणपणे ३ वाजेच्या सुमारास इथे हे मजूर जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळूहळू हे सर्वजण जमा झाले आणि त्यांनी आमच्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी करायला सुरुवात केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी जमावाला पांगवायला सुरुवात केली. संध्याकाळी ४.३० च्या सुमारास गर्दी कमी होऊ लागली. या सगळ्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

आम्ही वांद्रे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांमध्ये मिळून ४५ हजार घरांपर्यंत राशन पुरवलं आहे. अनेक घरांमध्ये ८ ते १० लोकं राहत आहेत. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की त्यांना घरी जाऊ दिलं जावं. पण आम्ही त्यांना समजावलं आहे की बाहेर पडणं चुकीचं आहे. या पार्श्वभूमीवर आता इथली परिस्थिती नियंत्रणात आली आहे. लोकं हळूहळू आपापल्या घरी जात आहेत. आसपासच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे मजूर आहेत.

झिशान सिद्दिकी, स्थानिक आमदार